IND vs WI 2019: वासिम जाफर याने विराट कोहली याच्यावर केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला वनडेमध्ये करणार इतकी शतकं
विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारतीय घरगुती क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा फॉर्म लक्षात घेत मोठी भविष्यवाणी केली आहे. जाफर म्हणाला की कोहली वनडेमध्ये 75 ते 80 शतके ठोकू शकतो. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्‍या वनडे सामन्यात कोहलीने शतक झळकावले. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 42 वे शतक होते. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विश्वविक्रम माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये एकूण 49 शतके केली आहेत. (टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवि शास्त्रींसह या 5 दिग्गजांना केले शॉर्टलिस्ट, या दिवशी होणार Interview)

जाफरने ट्विट करत लिहिले की, "11 डावांच्या विश्रांतीनंतर काम पुन्हा सुरू झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोहलीचे आणखी एक शतक. मला वाटते एकदिवसीय सामन्यात तो 75-80 शतके करेल."

विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये विराटने शतकी खेळी करत कारकिर्दीतले 42वे शतक पूर्ण केले. त्याच्या या शतकाने अनेक विक्रम मोडले. तेंडुलकरच्या शतकांशी बरोबरी करण्यासाठी त्याला सात शतकांची गरज आहे. तेंडुलकर या क्रमवारीत 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रिकी पॉटिंग याला मागे टाकण्यासाठी कोहलीला चार शतकांची गरज आहे. कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कोहलीचे हे विंडीजविरुद्ध 8 वे शतक आहे. या खेळीसह कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आठवे स्थान पटकावले आहे. त्याने 11406 धावांसह भारताचा माजी कर्णार सौरव गांगुली याचा विक्रम मोडला आहे. गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11363 धावा केल्या आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सचिन अव्वल स्थानी आहे.