विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला (Indian Team) लवकरच एक नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी मिळवणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयने (BCCI) मुख्य प्रशिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी 6 दिग्गजांची निवड केली आहे. यामध्ये टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांचाही समावेश आहे. शास्त्री यांना या निवड प्रक्रियेत थेट प्रवेश मिळाला आहे. शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर आहेत. शास्त्री आणि कंपनीचा करार विश्वचषकनंतर संपला होता. पण, विंडीज दौऱ्या लक्षात घेत 45 दिवसांनी त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आला. क्रिकेटनेक्स्टच्या वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षकपदासाठी 6 उमेदवारांची मुलाखत शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी मुंबईत घेतली जाईल. (IND vs WI 2nd ODI: एव्हिन लुईस याला बाद करण्यासाठी विराट कोहली याने टीपला एकहाती झेल, पहा Photos)
यंदा टीम इंडियाच्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची निवड माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या अध्यक्षतेखाली बनलेली तीन सदस्यीय समिती करणार आहे. या समितीमध्ये देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी आहेत. दरम्यान, बीसीसीआयने मंजूर केलेल्या नावांमध्ये शास्त्रीं व्यतिरिक्त न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन(Mike Hesson), ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि श्रीलंकेचे प्रशिक्षक टॉम मूडी (Tom Moody), वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू आणि अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स (Phil Simmons) यांचा समावेश आहे. याशिवाय मॅनेजर लालचंद राजपूत (Lalchand Rajput) आणि माजी भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंह (Robin Singh) यांचादेखील समावेश आहे.
निवड झालेल्या उमेद्वारांपैकी तीन जणांची मुलाखत स्काइपद्वारे घेतली जाईल. यात शास्त्री, मूडी हेसन आणि सिमन्स आहेत. शास्त्री सध्या शास्त्री सध्या विंडीज दौऱ्यावर आहे तर अन्य तीन आपापल्या देशात आहेत. मुलाखतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.