विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यंदा वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वनडे सामन्यात आपले उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. भारत (India) आणि विंडीजमधील दुसऱ्या वनडे सामन्यात विराटने आपल्या आक्रमक फलंदाजीने विंडीज गोलंदाजांच्या नाकी-नऊ आणले होते. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन 2 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कोहलीने रोहित शर्मा याच्या साथीने भारताचा डाव सावरला. विंडीजविरुद्ध आजच्या खेळी दरम्यान विराटने अनेक विक्रम मोडत नवीन रेकॉर्डची नोंद केली. यात पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या विक्रमांची समावेश आहे. (IND vs WI 2nd ODI: सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग या जोडीला मागे टाकत विराट कोहली-रोहित शर्मा यांची विक्रमी भागीदारी)

दरम्यान, विंडीजची सुरवात देखील काही चांगली झाली नाही. क्रिस गेल यंदादेखील प्रभावी खेळी करू शकला नाही. त्यानंतर त्याच्याबरोबर सलामीला आलेल्या एव्हिन लुईस (Evin Lewis) याने डाव सावरला आणि संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या गोलंदाजीवर मोठा शॉट शॉट मारण्याच्या नादात लुईस झेल बाद झाला. विराटने लुईसला माघारी धाडण्यासाठी अप्रतिम झेल घेतला. लुईस 65 धावा करत बाद झाला. पहा इथे:

दरम्यान, कोहलीची शतकी खेळी आणि युवा खेळाडू श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विजयासाठी विंडीजसामोर 280 धावांचे आव्हान दिले होते. पण, पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे विंडीजला 46 ओव्हरमध्ये 270 धावांचे लक्ष्य दिले. आजच्या सामन्यात विराटने एक नाही तर तब्बल तीन विक्रम मोडले आहेत. कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये 42 वे शतक साजरे केले. या सामन्यात कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावांची खेळी केली. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वात जलद दोन हजार धावा करणारा कोहली हा भारताचा अव्वल खेळाडू ठरला आहे. कोहलीने विंडीजविरुद्ध 34 डावांमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या.