रवींद्र जडेजा (Photo Credits: Twitter / ICC)

IND vs SL T20I Series: भारत दौऱ्यावर (India Tour) वेस्ट इंडिज संघाचा एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत धुव्वा उडवल्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) काही दिवसांच्या ब्रेकनंतर श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. भारत दौऱ्यावर दासून शनाका याचे लंकन वाघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने दौऱ्याची सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्याच्या मालिकेतील अंतिम सामना जिंकून संघाने दौऱ्याचा शेवट गोड केलं, मात्र 4-1 अशी मालिका गमावली. त्यामुळे श्रीलंका संघाचे लक्ष आता आपली विजयी लय कायम ठेवण्याचे असेल. दुसरीकडे, या मालिकेपूर्वी यजमान भारतीय संघासाठी एक मोठी बातमी म्हणजे दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघात परतला आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे पहिले दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला. त्यानंतर त्याला विंडीजविरुद्ध मालिकेसाठी देखील विश्रांती देण्यात आली आहे. (IND vs SL T20I Series 2022: श्रीलंकाविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियात 5 सलामी फलंदाज, कर्णधार रोहित शर्मा कसे साधणार संघाचे संयोजन?)

अशा परिस्थितीत तीन महिन्यांचा आराम केल्यावर जडेजा संघात परतला आहे. श्रीलंकाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी जडेजा अष्टपैलू म्हणून आघाडीचा दावेदार असेल. जडेजाने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता. तर जडेजाच्या आगमनामुळे टीम इंडिया आणखी मजबूत होईल. माजी कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना 24 फेब्रुवारी, दुसरा 26 आणि तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 27 फेब्रुवारीला होणार आहे. पहिला सामना लखनऊ तर उर्वरित दोन सामने धर्मशाला येथे होणार आहेत. दरम्यान, जडेजा परतल्यामुळे युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरचे प्लेइंग इलेव्हन मधील स्थान धोक्यात येऊ शकते. विंडीजविरुद्ध तीनही टी-20 सामन्यात बॅटने व अंतिम सामन्यात बॉलने महत्वपूर्ण योगदान देऊनही अय्यरला श्रीलंकेविरुद्ध बेंचवर बसावे लागू शकते.

तथापि, विराट आणि पंतची अनुपस्थितीत लक्षात घेऊन व दीपक चाहर उपस्थित नसल्यास जडेजासोबत आणखी एक अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यर याला रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड संधी देण्याचा विचार करू शकतात. दीपक चाहरला विंडीजविरुद्ध टी-20 सामन्यात हॅमस्ट्रिंग त्रास जाणवला होता, त्यामुळे त्याच्या श्रीलंकेविरुद्ध खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आता जडेजामुळे वेंकी अय्यर बाहेर पडणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम येथे पहिला सामना खेळला जाणार आहे.