IND vs SL T20I Series 2022: श्रीलंकाविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियात 5 सलामी फलंदाज, कर्णधार रोहित शर्मा कसे साधणार संघाचे संयोजन?
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL T20I 2022: वेस्ट इंडिज संघावर मर्यदित षटकांच्या मालिकेत वर्चस्वपूर्ण कामगिरीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) आता श्रीलंकेचा (Sri Lanka) सामना करण्यासाठी सज्ज आहे. श्रीलंका मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. जखमी केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. विराट कोहली आणि रिषभ पंत यांना टी-20 साठी बायो बबलमधून 10 दिवसाची विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही फलंदाज मधल्या फळीत खेळायचे, पण त्यांच्या जागी सलामीच्या फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य संघ संयोजन करणे कठीण होईल असे दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-20 मध्ये तो स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि फ्लॉप ठरला. (IND vs SL Series 2022: भारताविरुद्ध T20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा, वनिंदू हसरंगाचे पुनरागमन; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी)

श्रीलंकेविरुद्ध मालिकेत रोहितसाठी पुन्हा एकदा मधली फळी अडचणीची ठरू शकते, कारण संघात विराट आणि पंत यांच्यासारखे फलंदाज खेळत नाही. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे सूर्यकुमार यादव, आणि वेंकटेश यांचा शानदार फॉर्म त्यांच्यासाठी दिलासा देणारा आहे. तसेच रवींद्र जडेजा देखील तंदुरुस्त होऊन संघात परतला आहे. श्रीलंका टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात असे पाच खेळाडू आहेत ज्यांनी टी20 मध्ये डावाची सुरुवात करताना चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, कर्णधार रोहित शर्मा, वेंकटेश अय्यर, ईशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. हे पाचही खेळाडू टीम-20 मध्ये सलामीला उतरले असून यातील बहुतांश खेळाडूंना भारतीय प्लेइंग इलेव्हन मधेही आजमावत. अशा स्थितीत रोहितसाठी योग्य संघ निवडणे डोकेदुखी ठरेल.

त्यामुळे रोहित स्वत: तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत असेल तर त्याच्या स्वत:च्या कामगिरीला फटका बसू शकतो. विंडीज विरोधात रोहित चौथ्या क्रमांकावर उतरला होता आणि धावा करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला होता. अशा परिस्थितीत रोहितला आपल्या फलंदाजीच्या क्रमाशी छेडछाड करणे महागात पडेल. त्यामुळे रोहित पुन्हा एकदा सलामीला उतरेल असे अपेक्षित आहे. तसेच मधल्या फळीत जडेजाच्या परतल्यामुळे काय बदल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.