जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test Day 1 Highlights: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज, 12 मार्चपासून बेंगलोर (Bangalore) येथे दुसऱ्या दिवस/रात्र कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया आपल्या पहिल्या डावात 252 धावांत गारद झाली. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या डावाची खराब सुरुवात झाली आणि दिवसाचा खेळ संपला तेव्हा संघाने 30 षटकांत 6 विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा फलंदाजी क्रम भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे धराशाही झाला तर अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने एका बाजूने मोर्चा सांभाळत 43 धावांची खेळी केली. भारत-श्रीलंका यांच्यातील बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) पहिल्या दिवसखेर निरोशन डिकवेला 13 धावा करून खेळत आहेत. दुसरीकडे, फलंदाजीने फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाला  (Team India) गोलंदाजांनी सामन्यात वर्चस्व मिळवून दिले आणि सामन्यातील रोमांच वाढवला. (IND vs SL Pink Ball Test Day 1: दिग्गजांनी सजलेल्या ‘नर्व्हस नाइंटी’च्या अनलकी फलंदाजांच्या यादीत आता श्रेयस अय्यर याची एन्ट्री)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 252 धावाच करू शकला. श्रेयस अय्यरने 98 चेंडूंत 10 चौकार आणि 4 षटकारांसह एकहाती झुंज देत 92 धावांची निर्णायक खेळी केली. याशिवाय विराट कोहलीने 23 आणि ऋषभ पंतने 39 धावा केल्या. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमाने प्रत्येकी तीन, धनंजय डी सिल्वाने दोन आणि सुरंगा लकमल याने एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ अडचणीत सापडला असून ते टीम इंडियाच्या आणखी 166 धावांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान भारताच्या 252 धावांच्या प्रत्युत्तरात लंकन संघाने कर्णधार दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, लाहिरू थिरिमने, धनंजय डि सिल्वा, चरिथ असलंका आणि मॅथ्यूज पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी 2 आणि अक्षर पटेलने 1 गडी बाद केला.

दरम्यान, पिंक-बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघाबद्दल बोलायचे तर भारताने यापूर्वी तीन गुलाबी चेंडू कसोटी मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी दोन (मायदेशी) कसोटी जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विदेश दौऱ्यावर झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत मोहाली येथील पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा तीन दिवसांत एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत आता रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाला घरच्या मैदानावरील आयपील विजयी घोडदौड सुरु ठेवण्याची चांगली संधी आहे.