IND vs SL 2nd Test: पिंक-बॉल कसोटीपूर्वी Rohit Sharma याला दिग्गज खेळाडूचा सल्ला, ‘हिटमॅन’ला त्याचा ट्रेडमार्क शॉट शॉट न खेळण्याचे केले आवाहन
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd Test: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) उत्कृष्ट पूल शॉट खेळणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तरीही माजी दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी हिटमॅनला किमान डावात लक्षणीय धावसंख्या गाठेपर्यंत तो शॉट खेळण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या कसोटी सामन्यात रोहित 29 धावांवर बाद होईपर्यंत चांगली फलनाडजाई करत होता. लाहिरू कुमाराच्या वेगापुढे रोहित अपयशी ठरला आणि भारतीय कर्णधार त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात फ्लॉप ठरला. यामुळे गावस्कर यांनी रोहितला क्रीजवर अधिक काळ राहण्यासाठी खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमधील काही इतर शॉट्सवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. (IND vs SL 2nd Test: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, KSCA ने गुलाबी कसोटीसाठी 100 टक्के प्रेक्षकांना दिली स्टेडियममध्ये येण्यास परवानगी)

“त्याचा विचार करायला हवा. तुम्ही असा युक्तिवाद करू शकता की हा एक उत्पादक शॉट आहे परंतु तो एकमेव शॉट नाही. त्याच्याकडे इतर अनेक शॉट्स आहेत. आता प्रत्येक गोलंदाज ज्याच्याकडे थोडाफार वेग आहे तो त्याच्या विरुद्ध असे म्हणेल की, ‘मला एक-दोन षटकार किंवा चौकार मारायला हरकत नाही, पण एक संधी मिळेल कारण तो चेंडू हवेत मारतो’,” गावस्कर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले. लक्षात घ्यायचे की मर्यादित षटकांत रोहितने पुल शॉट्स खेळून भरपूर धावा केल्या आहेत. किंबहुना, त्याला फाइन-लेग बाऊंड्री ओलांडून वेगवान गोलंदाजांना फटके मारताना पाहणे हा चाहत्यांसाठी सर्वात आनंददायी क्षण आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र रोहितने पुल शॉट्स खेळण्यापासून दूर राहावे आणि तो 80,90, 100 धावसंख्येपर्यंत पोहोचेपर्यंत ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले पाहिजे असे गावस्कर यांना वाटते.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 12 मार्चपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. आणि लंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत रोहित अधिक चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. बेंगळुरू प्रथमच दिवस/रात्र कसोटी सामन्याचे आयोजन करणार असून गुलाबी कसोटीत टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. भारताने आतापर्यंत चार पिंक-बॉल कसोटी सामने खेळले असून तीन जिंकले आहेत तर एका सामन्यात त्यांना लज्जास्पद पराभव पत्करावा लागला आहे.