IND vs SL: कर्णधार रोहित शर्मा याचा असा विक्रम जो एमएस धोनी-विराट कोहली पण कधीच करू शकले नाहीत
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test: टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे. भारताने बेंगलोर (Bangalore) येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या सामन्यात 303/9 वर घोषित केल्यानंतर पाहुण्या संघापुढे विजयासाठी 447 धावांचे आव्हान दिले. तथापि विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने त्याचे 14 वे कसोटी शतक ठोकून 107 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली परंतु दुसऱ्या टोकाने विकेट नियमितपणे पडत राहिल्या आणि अखेर संपूर्ण संघ 208 धावांवर बाद झाला. यासह रोहित पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर टी-20, एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये क्लीन स्वीपसह आपल्या कॅप्टन्सीची सुरुवात करणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. (ICC WTC 2021-23 Points Table: श्रीलंकेचा सुपडा साफ करताच टीम इंडियाला फायदा, जाणून घ्या पॉईंट टेबलमध्ये आता कोणत्या क्रमांकावर सरकली)

2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्माला टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहितकडे वनडे संघाची कमान देखील सोपवण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे तो या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहितची पहिली मालिका मायदेशात होती. वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 3-0 असा क्लीन स्वीप केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनंतर विराट कोहली कसोटी कर्णधार म्हणून पायउतार झाला आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहितला या फॉरमॅटचा पूर्णवेळ कर्णधारची जबाबदारी देण्यात आली. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. अशा प्रकारे रोहितच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला.

बेंगलोर कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर बंगळुरू येथे दुसऱ्या डावात आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील 7 विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात 5 बळी घेणारा जसप्रीत बुमराहने सामन्यात 47 धावा देऊन 8 गडी बाद केले. भारतीय वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये केलेली ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या विजयासह रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधार म्हणून सलग 5 वा क्लीन स्वीप पूर्ण केला आहे.