IND vs SL 2nd T20I: रोहित शर्मा याला मागे टाकत विराट कोहली नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, एमएस धोनी याच्यासह 'या' एलिट यादीतही झाला समावेश, वाचा सविस्तर
विराट कोहली (Photo Credits: IANS)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli याने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. श्रीलंकाविरुद्ध 1 धाव करताच विराट आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. या सामन्यापूर्वी विराटने सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासह टी-20 मध्ये 2633 धावा केल्या होत्या. आणि विराटने रोहितला मागे टाकत सर्वाधिक टी-20 धावांची नोंद केली आहे. इतकाच नाही तर 7 धावा करून विराट श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. विराटने श्रीलंकाविरुद्ध एकूण 313 धावा केल्या, तर रोहितने श्रीलंकाविरुद्ध सर्वाधिक 289 धावा केल्या आणि आता विराटने त्याला मागे टाकले आणि अव्वल स्थान मिळवले. याच्याशिवाय विराट माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या एका खास लिस्टमधेही सामिल झाला आहे. विराटने टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करणारा विराट एकंदरीत 6 वा तर दुसरा भारतीय कर्णधार बनला. विराटने 24धावा पूर्ण करताच हा टप्पा गाठला. विराटपूर्वी फक्त धोनीने कर्णधार म्हणून 1,000 टी-20 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार धोनीने भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 1,112 धावा केल्या आहेत. धोनीने 72 साम्यांच्या 62 डावांमध्ये ही कामगिरी बजावली आहे. (IND vs SL 2nd T20I: विराट कोहली याने हरभजन सिंह याची केलेली नक्कल पाहून गोलंदाजालाही झाले हसू अनावर, पाहा Video)

शिवाय, विराटने सर्वात जलद ही कामगिरी केली. विराटने फक्त 30 डावांमध्ये ही कामगिरी केली. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याने 31, केन विल्यमसन (Kane Williamson)- 36, इयन मॉर्गन - 42, विल्यम पोर्टरफिल्ड - 54 तर धोनीने 57 डावांमध्ये हा पराक्रम केला होता.  कोहली शानदार फॉर्ममध्ये असून वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 मालिकेत दोन स्फोटक डाव खेळले होते. रनमशीनने पहिल्या टी-20 मध्ये 50 चेंडूंत नाबाद 94 आणि तिसऱ्यामध्ये 29 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली.

श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी खाली करत श्रीलंकेचे 9 गडी बाद केले. इंदोरमध्ये सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 143 धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताकडून शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक 3, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांनी 2, तर वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.