IND vs SL 2021: टीम इंडिया जुलैमध्ये करणारा श्रीलंका दौरा, विराट-रोहित नसणार व्हाइट बॉल संघाचा भाग
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SL 2021: बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी टीम इंडिया (Team India) मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी श्रीलंका (Sri Lanka) दौरा करेल, ज्यात तीन वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. तथापि, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या दौऱ्यात भाग घेणार नाहीत कारण ते यादरम्यान इंग्लंडमध्ये (England) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त असतील. गांगुली यांनी पीटीआयला सांगितले की, “आम्ही जुलै महिन्यात ज्येष्ठ पुरुष संघासाठी व्हाईट बॉल मालिकेचे नियोजन केले आहे जिथे ते श्रीलंकेत टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय सामने खेळतील.” गांगुली म्हणाले की, श्रीलंका दौर्‍यासाठी असलेल्या भारतीय संघात (Indian Team) इंग्लंड कसोटी मालिकेसाठी निवडलेला एकही खेळाडू नसेल. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया भारतात आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. (IPL 2021 मधील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुली काय म्हणाले? घ्या जाणून)

आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अद्याप निश्चित करण्यात आलेले नसल्यामुळे शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल यांसारखे खेळाडू सामना खेळण्यासाठी सज्ज असतील हे सुनिश्चित करण्यासाठी बीसीसीआयने हा दौरा आयोजित केला आहे. “हो, ही व्हाईट बॉल विशेषज्ञांची टीम असेल. ती वेगळी टीम असेल,” गांगुली पुढे म्हणाले. या दौर्‍यामागील तर्क स्पष्ट करताना बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “बीसीसीआय अध्यक्ष फार उत्सुक आहेत की आमचे सर्व सर्वोच्च खेळाडू सज्ज आहेत आणि इंग्लंड मध्ये व्हाईट बॉलचा लेग नसल्याने जुलै महिन्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.” कोहली आणि शर्मा यांना ब्रिटनहून येण्याची गरज नाही, जिथे काही वेगळे क्वारंटाईन नियम आहेत.

दरम्यान, विराट-रोहित यांच्यासारख्या तगड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. लेगस्पिनसाठी चहलचा पर्याय म्हणून राहुल चाहर किंवा राहुल तेवतियाला संधी दिली जाऊ शकते. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, देवदत्त पडिक्क्ल आणि श्रेयस अय्यर सामना खेळण्यास फिट आहेत की नाही याची देखील पाहणी करावी लागेल. श्रेयसवर मागील महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यामुळे त्याने संपूर्ण आयपीएलमध्ये माघार घेतली होती. पृथ्वी शॉ याची वनडे कारकीर्द पुढे जाऊ शकली नाही, तर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्यासारखे फलंदाज संघात आपला दावा मजबूत करण्यासाठी उत्सुक आहेत.