IND vs SA Test 2021-22: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी स्टार सलामीवीर आणि कसोटी उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या दुखापतीनंतर प्लेइंग 11 च्या निवडीबाबत टीम इंडिया (Team India) समोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. सलामीवीर म्हणून केएल राहुलचे (KL Rahul) स्थान निश्चित झाले असले तरी रोहितच्या जागी या दोन फलंदाजांमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या जागी टीम इंडियात कोणत्या फलंदाजाची वर्णी लागू शकते ते पाहूया. (India Tour of South Africa 2021-22: असा असेल भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा; जाणून घ्या वेळापत्रक, Squad, टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती)
1. शुभमन गिल (Shubman Gill)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2020 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलची पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. गिलने यंदा मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून शेवटची कसोटी खेळली. न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत गिलने अनुक्रमे 52, 1, 44 आणि 47 धावा केल्या. तसेच शुभमनने आतापर्यंत एकूण 10 कसोटी खेळल्या असून 558 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. गिलला रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूसोबत फलंदाजीचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत तो सलामीवीराची भूमिका बजावू शकतो.
2. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)
रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवालला मोठा दावेदार मानला जात आहे. या महिन्यात मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात मयंकने शानदार शतकही झळकावले. या कसोटी सामन्यात अग्रवालने 150 आणि 62 धावा केल्या. अग्रवालने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटीत भारतासाठी 16 कसोटी सामन्यांमध्ये 47.93 च्या सरासरीने 1294 धावा केल्या आहेत. त्याने 27 डावांमध्ये 2 द्विशतके, 4 शतके आणि 5 अर्धशतके ठोकली आहेत.