दक्षिण आफ्रिकेत (South Africa) 1992 नंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) कंबर कसून सराव करत आहे. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) शब्दात सांगायचे तर, कसोटी सामना जिंकण्यासाठी 20 विकेट्स घेणे आवश्यक आहे. आणि गोलंदाज हे विकेट घेतात. म्हणजे कसोटीत फलंदाजापेक्षा गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असते. सध्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (South Africa Tour) टीम इंडिया आक्रमक वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसह पोहोचली आहे. भारतीय गोलंदाजांनी गेल्या तीन वर्षात प्रभावी छाप पाडली आहे. आणि आता ते दक्षिण आफ्रिकेत देखील ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असतील. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांच्या 5 शक्तींबद्दल जे दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी मालिकेत धोक्याची घंटा बनू शकतात आणि टीम इंडियाच्या विजयाची हमी देऊ शकतात. (IND vs SA: टीम इंडिया समोर खूप मोठा पेच, ‘या’ त्रिमूर्तीने वाढवली डोकेदुखी; कोण खेळणार , कोणाची होणार सुट्टी? वाचा सविस्तर)
बुमराहच्या नेतृत्वात करणार ‘हल्लाबोल’
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतून केली होती. त्या मालिकेत त्याने 14 विकेट्सही घेतल्या होत्या. बुमराहने जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 7 विकेट्स घेतल्या. साहजिकच त्याच्या मनात दौऱ्याच्या चांगल्या आठवणी आहेत. त्यामुळे बुमराहची संघातील जबाबदारीही वाढली आहे. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद शमी असेल जो सध्या भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम आणि विश्वासार्ह वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या जोडीची ताकद वाढवतो. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही सिराजने शानदार गोलंदाजी केली.
याशिवाय, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर अष्टपैलू भूमिका बजावलेला मुंबईकर शार्दूल ठाकूर देखील दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्टीवर संघाच्या कामी येऊ शकतो. तसेच स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत शार्दूलवर जबाबदारी वाढते. तसेच जयंत यादव देखील बॅटने संघात योगदान देऊ शकतो. भारतीय गोलंदाजांनीही अलीकडे कसोटी सामने खेळले आहेत. त्यांना याचा लाभही मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया ज्या प्रकारे तयारी करत आहे, त्यावरून संकेत स्पष्ट होत आहेत.