IND vs SA Series 2022: टीम इंडियावर दुखापतीने सावट आणखी गडद, आणखी एक तडाखेबाज खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेला मुकण्याची शक्यता
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

Harshal Patel injury: टीम इंडियामधील दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ताजी भर म्हणजे हर्षल पटेल (Harshal Patel). गुरुवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) गोलंदाज त्याच्या बॉलिंगच्या हाताला दुखापत झाल्याने संपूर्ण सामन्यात एक षटक टाकू शकला. हर्षल पटेल हा टी-20 मध्ये भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. हर्षलने आयपीएल (IPL) 2021 मध्ये पर्पल कॅप जिंकली. बेंगलोरकडून खेळताना हर्षल आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. यानंतर त्याला भारतीय संघाकडून (Indian Team) खेळण्याची संधीही मिळाली आणि त्याने आतापर्यंत खेळलेल्या 8 टी-20 सामन्यांमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत. (IND vs SA Series 2022: क्रिकेटप्रेमींना दिलासा! दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश)

गुजरातच्या फिल्डिंग करताना हर्षलच्या बोटाला दुखापत झाली आणि तो मैदानातून बाहेर निघून गेला. त्याच्या दुखापतीला टाके घालण्यात आले, जे बरे होण्यासाठी 4 आठवडे लागू शकतात, ज्यामुळे हर्षल पटेल दक्षिण आफ्रिका मालिकेतून (South Africa Series) बाहेर पडू शकतो. दरम्यान हर्षल पटेल आपली पुनर्प्राप्ती पूर्ण करण्यासाठी येत्या काही दिवसांत एनसीएला रवाना होईल. तसेच जर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्ले ऑफसाठी पात्र ठरले तर तो त्यांच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. हर्षल पटेलशिवाय इतर पाच खेळाडू आजार आणि दुखापतीतून सावरत आहेत. अजिंक्य रहाणे वगळता रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर यांनी भारतीय संघाच्या दुखापतींची यादी सजली आहे. पृथ्वी शॉ टायफॉइडमधून बरा झाला आहे पण, दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी तो संशयास्पद आहे.

दरम्यान, भारतीय संघाला जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. मुख्य संघाचे प्रमुख खेळाडू यात भाग घेणार नसल्याचे वृत्त समोर आले आहेत. अशा परिस्थितीत हर्षल पटेल याच्यावर मोठी जबाबदारी असेल. तसेच दीपक चाहर देखील दुखापतीमुळे आधीच बाहेर आहे आणि आता हर्षल दीर्घकाळ बाहेर राहिल्यास टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. पटेलची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण त्याची दुखापत आणखीनच वाढल्यास बेंगलोर आणि टीम इंडियाचा त्रास वाढू शकतो.