उमरान मलिक, केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA T20I 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सर्वात संस्मरणीय आवृत्तीनंतर आता टीम इंडियाकडे (Team India) सर्वांचे लक्ष लागून असेल. 9 जून 2022 रोजी सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पाहुणचार करणार आहे. मालिकेतील पहिला सामना टीम इंडियासाठी महत्वाचा असले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) विजय खिशात घातल्यास ते सलग 13 टी-20 जिंकण्याचा पराक्रम करतील, जे आतापर्यंत कोणताही संघ करू शकलेला नाही आणि या स्वरूपातील सर्वकालीन महान संघ बनतील. बीसीसीआयने केएल राहुलच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय संघाची नियुक्ती केली, त्यामधील अनेक खेळाडूंनी आयपीएल 2022 मध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. (IND vs SA Series 2022: ‘आम्ही लहानपणापासून खूप वेगाने खेळत आहोत...’, T20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे उमरान मलिकवर मोठे विधान)

1. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

हार्दिक पांड्याने आयपीएल फायनलमध्ये सर्वात प्रभावशाली अष्टपैलू प्रदर्शनापैकी एक सादर करत आलोचकांना योग्य प्रतिसाद दिला. गुजरात टायटन्सचा कर्णधार सीझनमध्ये त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत राहिला, परंतु ‘कुंग-फू’ पांड्याने आपली योग्यता सिद्ध केली आणि गेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात कमबॅक केले. हार्दिकने 487 धावा आणि 8 विकेट्ससह हंगामाची सांगता केली आणि आता आगामी टी-20 मालिकेसाठी तो आत्मविश्वासाने भरपूर असेल. या अष्टपैलू खेळाडूवर अनेकांचे लक्ष असेल हे नाकारता येत नाही.

2. केएल राहुल (KL Rahul)

राहुलच्या नेतृत्वासह त्याच्या फलंदाजीने त्याला खूप प्रशंसा मिळवली. आयपीएल 2022 मधील लखनौ सुपर जायंट्सच्या मोहिमेदरम्यान राहुलने बॅटने मौल्यवान योगदान दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात लखनौचा पराभव झाला असला तरी राहुलसाठी हंगाम चांगला ठरला. सलामीच्या फलंदाजाने 51.33 च्या सरासरीने आणि 135.38 च्या स्ट्राइक रेटने 616 धावा केल्या आहेत आणि आता आंतरराष्ट्रीय मालिकेतही तो आपली लय कायम ठेवू इच्छित असेल.

3. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

दिनेश कार्तिकने केवळ निवडीचे दरवाजेच ठोठावले नाहीत तर आयपीएलमधील चमकदार कामगिरीने ते पूर्णपणे उघडले. 183 च्या स्ट्राइक-रेटसह आयपीएलचा ‘सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ पुरस्कार जिंकणाऱ्या डीकेने आपला ‘फिनिशर’ टॅग पुन्हा एकदा सिद्ध केला. 55 च्या सरासरीने 330 धावा करून दिनेश कार्तिक पुन्हा एकदा भारतीय जर्सीत परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

4. उमरान मलिक (Umran Malik)

जम्मू-काश्मीर मधील सनरायझर्स हैदराबादच्या वेगवान मशिनने प्रत्येक सामन्यात 150 किमी प्रतितास वेगाने त्याच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पदार्पणाच्या मोसमातील 14 आयपीएल सामन्यांमध्ये उमरानने 22 विकेट्स घेतल्या आहेत ज्यात त्याच्या 25 धावांत 5 बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दिग्गजांनी या स्फोटक गोलंदाजाला पाठिंबा दिला आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात आपला वेग कायम ठेवतो की नाही हे पाहणे बाकी आहे.

5. अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)

पंजाब किंग्सचा स्टार हा आणखी एक वेगवान गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये सर्वात लक्षवेधी ठरला आहे. 23 वर्षीय पंजाब किंग्जचा डेथ ओव्हर्स वेळी चांगलाच प्रभावी ठरला आहे, त्याचे खतरनाक यॉर्कर्स, वाइड यॉर्कर्स गोलंदाजी करण्याची क्षमता, ब्लॉक होलला टार्गेट करणे यामुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. अर्शदीपने 14 सामन्यांत 7.70 च्या इकॉनॉमी रेटसह 10 विकेट्स घेतल्या. मालिकेत त्याला संधी मिळाल्यास तो आपल्या फॉर्म कायम ठेवण्यास नक्कीच उत्सुक असेल.