IND vs SA Series 2022: हार्दिक पांड्याने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 अष्टपैलू खेळाडूंपैकी कोणाला मिळणार संधी?
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IND vs SA Series 2022: भारतीय संघाला (Indian Team) 9 जूनपासून दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा समवेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर टीम इंडियामध्ये (Team India) अनेक स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे प्रभारी कर्णधार केएल राहुलचे (KL Rahul) टेन्शन वाढले आहे, कारण टीम इंडियामध्ये एकूण चार अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (IND vs SA T20 Series: आयपीएलचे सहकारी आता पक्के प्रतिस्पर्धी! एकाच संघात खेळलेले आता दक्षिण अफ्रीकेच्या मालिकेत एकमेकांसोमर उभे ठाकले)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आणि 15 सामन्यांमध्ये 487 धावा केल्या, तर 8 विकेट घेतल्या आहेत. हार्दिकने आयपीएलदरम्यान तंदुरुस्तीही साधली असून त्याने गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. खालच्या क्रमवारीत येत असताना हार्दिक पांड्या फलंदाजीत निष्णात खेळाडू आहे. अशा परिस्थितीत आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी तो प्रबळ दावेदार दिसत आहे. दुसरीकडे, आयपीएल 2022 मध्ये व्यंकटेश अय्यर अक्षरशः फ्लॉप ठरला. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना अक्षर पटेल यालाही विशेष कामगिरी करता आली नाही. अक्षर पटेल सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे वेंकटेश अय्यरसह अक्षरला देखील बाहेर बसावे लागू शकते.

त्याचबरोबर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या रूपाने टीम इंडियात दोन फिरकीपटू आहेत. अशा स्थितीत अक्षर पटेलची जागा धोक्यात आली आहे. दुसरीकडे, यावर्षी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभाग घेणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची आणि वर्ल्ड कपसाठी योग्य संयोजन तयार करण्याची चांगली संधी आहे.