रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी भारताने 497 धावा करुन पहिला डाव घोषित केला. एकीकडे रोहित शर्माने दुहेरी शतक झळकावत संघाला चांगल्या स्थितीत आणले, तर उमेश यादव (Umesh Yadav) याने शेवटच्या काही क्षणी फलंदाजी करून इतिहास रचला. भारतीय संघात गोलंदाज म्हणून खेळणाऱ्या उमेशने 5 मोठ्या षटकाराच्या मदतीने 10 चेंडूत 31 धावा केल्या. उमेशने त्याच्या तुफानी खेळीने इतिहास रचला. या डावात उमेशचा स्ट्राईकरेट 310 होता आणि आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही फलंदाजांचा स्ट्राईकरेट पहिले 10 बॉल खेळल्यानंतर इतका झाला नव्हता. (IND vs SA 3rd Test: उमेश यादव याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ठोकले एकापाठोपाठ 5 षटकार, विराट कोहली ही झाला अवाक, पहा Video)
उमेशने या सामन्याच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये सलग दोन षटकार ठोकले आणि असे करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला. उमेशच्या आधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि फॉफी विल्यम्स (Foffie Williams) यांनी हा पराक्रम केला होता. विल्यम्सने 1948 मध्ये इंग्लंडच्या जिम लेकरविरुद्ध ही कामगिरी केली होती, तर सचिनने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन (Nathan Lyon) विरुद्ध अशी खेळी केली होती. उमेशने हे पाचही षटकार आफ्रिकी गोलंदाज जॉर्ज लिंडे (George Linde) याच्या गोलंदाजीवर ठोकले. शिवाय, कोणत्याही कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा सचिन, झहीर खान, महेंद्र सिंह धोनी यांच्यानंतर उमेश चौथा भारतीय फलंदाजही ठरला.
दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने क्विंटन डी कॉक याची विकेट मिळवली. आणि आफ्रिका संघाने पहिल्या डावात फलंदाजी करत 9 धावांवर 2 विकेट गमावले आहेत. एकीकडे भारतीय संघ क्लीन-स्वीप करण्याच्या प्रयत्नात आहे तर आफ्रिकी संघ सामना जिंकत दौऱ्याचा शेवट गोड करू पाहत आहे. पण, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच प्रतिद्वंती संघाच्या फलंदाजांना मुश्किलीत टाकले आहे.