भारताने त्यांचा पहिला डाव 4 बाद 497 धावांवर घोषित केला. भारतासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 212 आणि अजिंक्य राहणे याने सर्वाधिक 115 धावा केल्या. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि एनरिच नॉर्टजे याने सुरुवातीला भारताला तीन धक्के दिले. रबाडाने मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा याला माघारी धाडले. तर नॉर्टजेने कर्णधार विराट कोहली याला बाद केले. विराटला बाद करत नॉर्टजेने टेस्टमधील पहिली विकेट घेतली. यांच्यानंतर रोहित आणि रहाणे यांनी दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान, रोहितने टेस्ट करिअरमधील पहिले दुहेरी शतक केले, तर रहाणेने देखील 11 वे टेस्ट शतक पूर्ण केले. रहाणेने तब्बल तीन वर्षानंतर घरच्या मैदानावर शतक केले आहेत.
रोहितने यापूर्वी पहिल्या दिवशी टेस्टमधील 6 वे शतक केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने राहणेची विकेट गमावली. रवींद्र जडेजा याने रोहितला साथ देत भारताला मोठा स्कोर करण्यास सहाय्य केले. नंतर रोहितने टेस्टमधील पहिले दुहेरी शतक केले आणि 212 धावांवर माघारी परतला. जडेजाने 51 धावांची खेळी केली. जवळपास एक वर्षानंतर भारतीय टेस्ट संघात पुनरागमन करणारा रिद्धिमान साहा काही खास करू शकला नाही आणि 42 चेंडूत 24 धावा करून आऊट झाला. मॅचच्या अखेरच्या काही क्षणात उमेश यादव (Umesh Yadav) याने 10 चेंडूत 31 धावांची वेगवान खेळी खेळली ज्यामध्ये त्याने पाच षटकार ठोकले. तर, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शाहबाझ नदीम आणि मोहम्मद शमी नाबाद राहिले.
दक्षिण आफ्रिकासाठी टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉर्ज लिंडे याने सर्वाधिक चार गडी बाद केले, तर रबाडाने तीन आणि एनिच नॉर्टजे आणि डॅन पीटने 1-1 गडी बाद केले.