IND vs SA 3rd Test Day 3: फॉलोऑन खेळणारा दक्षिण आफ्रिका संघ अडचणीत, तिसऱ्या दिवसाखेर भारताला क्लीन-स्वीप करण्याच्या जवळ
टीम इंडिया (Photo Credits: Twitter/BCCI)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. तिसऱ्या दिवशी भारताने आफ्रिकेला पहिल्या डावात 162 धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर भारताने यंदाच्या मालिकेतील दुसरे फॉलोऑन दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिका संघाने 132 धावांवर 8 विकेट गमावले आहेत. आणि भारताला आता मालिका क्लीन-स्वीप करण्यासाठी चौथ्या दिवशी विकेटची गरज आहे. यंदाच्या मालिकेत दुसऱ्यांदा फॉलोऑन खेळणाऱ्या आफ्रिका संघाची स्थिती पहिल्या वेळेप्रमाणेच आहे. भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकी फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला आणि त्यांना मोठा स्कोर करू दिला नाही. शिवाय, आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटूही खास कामगिरी करू शकले नाही. अंतिम टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला होता. (IND vs SA 3rd Test: शाहबाज नदीम याचे धमाकेदार टेस्ट डेब्यू, पहिल्या कसोटी विकेटसह केला 'हा' विक्रम, वाचा सविस्तर)

टॉस जिंकून भारताने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण संघाची सुरुवात चांगली झाली नाही. 39 धावांवर भारताने पहिले तीन फलंदाज बाद केले. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर, सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. रोहित आणि अजिंक्यने पहिल्या दिवशी सावध फलंदाजी केली. पण नंतर त्यांनी जोर धरला आणि मोठे शॉट्स खेळण्यात सुरुवात केली. रोहित आणि रहाणेची भागीदारी आफ्रिकासाठी मोठी डोकेदुखी ठरत असताना जॉर्जे लिंडे याने रहाणेला बाद करत संघात मोठी सफलता मिळवून दिली. रहाणेने 115 धावा केल्या. रोहित आणि रहाणेने दुहेरी शतकी भागीदारी करत संघाला मोठा स्कोरच्या जवळ नेले. त्यानंतर रवींद्र जडेजा याने ५१ आणि उमेश यादव याने वेगाने ३१ धावा करत संघाच्या धावांमध्ये महत्वाचे योगदान दिले.

दरम्यान, आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारताकडून उमेश यादव याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.