रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

वनडे आणि टी-20 नंतर कसोटी क्रिकेटमधील हिट फलंदाज म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) प्रयत्नशील आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो सलामी फलंदाज म्हणून यशस्वी ठरला आहे. आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने तिसरे शतक झळकावले. रोहितच्या कसोटी कारकीर्दीतले हे 6 वे शतक तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसरे कसोटी शतक होते. रोहितचे हे शतक अशा वेळी आले जेव्हा संघाला त्याची अत्यंत गरज होती. संघाचे पहिले तीन फलंदाज मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाले आणि संघावर प्रचंड दबाव होता. रोहितने त्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासमवेत संघाचा डाव सांभाळला. रोहितने त्याचे सहावे शतक पूर्ण करण्यासाठी 130 चेंडूंचा सामना केला. (IND vs SA 3rd Test Day 1: खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा थांबला; पहिल्या दिवसाखेर भारत मजबूत स्थितीत)

या शतकासह रोहितने एक नाही तर सहा विक्रमांना गवसणी घातली. रोहित यंदाच्या टेस्ट शतकासह तब्बल 7 रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आफ्रिकाविरुद्ध तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने केलेले हे रेकॉर्ड खाली पाहू शकतात:

1. आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात पहिल्या षटकार मारताच रोहित आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला खेळाडू ठरला. यासह त्याने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याला मागे टाकले. रोहितने 14 षटकार मारले आहेत तर, स्टोक्स 13 शतकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर 7 शतकारांसह रवींद्र जडेजा आणि मयंक अग्रवाल आहे.

2. आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये अर्धशतकी खेळीनंतर रोहितने शानदार विक्रम आपल्या नंबर केला. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक झळकावले. रांची कसोटी सामन्यात आफ्रिकाविरुद्ध सर्वाधिक टेस्ट अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये मोहम्मद अझरुद्दीन आणि गौतम गंभीर यांची बरोबरी केली. या तिघांनी आफ्रिकाविरुद्ध 3 अर्धशतकं केली आहेत.

3. या शतकी खेळीसह एका मालिकेत 100 किंवा त्याहून अधिक धावा करणारा रोहित दुसरा भारतीय सलामी फलंदाज ठरला. यापूर्वी दिग्गज सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम केला होता. गावस्कर यांनी तीन वेगवेगळ्या मालिकांमध्ये तीन वेळा शतक किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

4. कसोटी मालिकेत षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितने सर्वांना पराभूत केले आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज शिमरोन हेटमेयर याने कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला होता. हेटमेयरने बांग्लादेशविरुद्ध एका मालिकेत 15 षटकार मारले होते. रोहितच्या आधी कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू हरभजन सिंह होता, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या 2010-11 च्या मालिकेत 14 षटकार ठोकले होते. रोहितने सध्याच्या मालिकेत आतापर्यंत 16 षटकार ठोकले आहेत.

5. रोहितने षटकार मारत 100 धावांची खेळी पूर्ण केली. षटकार मारून शतक पूर्ण करणारा रोहित तिसरा भारतीय फलंदाज आहे. रोहितने दोनदा ही कामगिरी गंभीरची बरोबरी केली. रोहितच्या अगोदर सचिन तेंडुलकर याने सहा वेळा आणि दोनदा गौतम गंभीर याने षटकार मारून कसोटी शतक पूर्ण केले.

6. षटकार मारत शतक पूर्ण करत रोहितने टेस्टमध्ये 2000 धावाही पूर्ण झाल्या. मालिकेतील रोहितचे हे तिसरे शतक आहे. यासह रोहितने सध्याच्या मालिकेत 400 धावा पूर्ण केल्या आहेत. या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक चौकार आणि सर्वाधिक षटकारांसह तो फलंदाजही आहे.

7. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका कॅलेंडर वर्षात सलामी फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. यंदाच्या वर्षात रोहितने नऊ शतक ठोकले आहेत. आणि आजचे हे त्याचे 37 वे आंतरराष्ट्रीय शतक होते.

यंदाच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये भारताला सुरुवातीला तीन मोठे धक्के बसल्यावर रोहितने टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांमध्ये चौथे विकेटसाठी 168 धावांची भागीदारी झाली.