IND vs SA 3rd Test Day 1: क्रिकेटपटू शाहबाझ नदीम याचा वयाच्या तिशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु,  15 वर्षांती तपश्चर्या आली फळाला , पहा Video
शाहबाझ नदीम (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतिल शेवटचा सामना खेळला जात आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून टीम इंडियाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाजाची नोंद झाली आहे. शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) याने आज भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात प्रवेश केला आहे. नदीमचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे.  2004 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या नदीमला 15 वर्षांनंतर भारतीय संघात संधी मिळाली आहे. याआधीही नदीमची संघात निवड झाली होती, पण त्याला पदार्पण करण्याची संधी कधीच मिळाली नाही. या सामन्यात तो रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना गोलंदाजीत साथ देईल. नदीमने प्लेयिंग इलेव्हनमध्ये इशांत शर्मा याची जागा घेतली. (IND vs SA 3rd Test: टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय; इशांत शर्मा ला विश्रांती, शाहबाझ नदीम याचे डेब्यू)

नदीमने वयाच्या 30 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 15 वर्ष लोटली आहेत, पण आता त्याची मेहनत फळली आहे. मागील काही काळापासून अनिल कुंबळे यांच्यानंतर हरभजन सिंह आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विन यांनी भारतीय संघासाठी फिरकी गोलंदाजीने चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत त्याचे स्थान संघात बनवले जात नव्हते. ऑर्थोडॉक्स फिरकीपटू नदीमने 2004 पासून 110 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात नदीमने 424 विकेट्स घेतल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 106 सामन्यांत 145 विकेट घेतले आहेत. शिवाय, 2015 ते 2017 दरम्यान रणजी ट्रॉफीच्या दोन मोसमात नदीमने 107 गडी बाद केले आहेत. 2015-16 च्या हंगामात त्याने 51 विकेट्स घेतल्या आणि पुढील मोसमात त्याने 56 विकेट मिळवून आपली दावेदारी दर्शवली. 2018मध्ये, नदीमला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय वनडे संघात स्थान मिळाले होते परंतु त्याला खेळायची संधी मिळाली नाही.

रांची येथे तिसर्‍या कसोटीच्या पूर्वसंध्येला कुलदीप यादव याच्या डाव्या खांद्यावर दुखण्याची तक्रार झाल्यानंतर नदीमला भारतीय संघात स्थान देण्यात आले. यापूर्वी कुलदीपला विशाखापट्टणम आणि पुणे टेस्टसाठी संघात स्थान मिळाले नव्हते.