IND vs SA 2nd Test: दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव आणि 137 धावांनी पराभव, सलग 11 वी मालिका जिंकत टीम इंडियाने मोडला ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड
(Photo Credits: Twitter / @BCCI)

दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध भारतीय संघाने (Indian Team) एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने 601 धावांचा मोठा स्कोर केला होता. याच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवशी आफ्रिकी संघ पहिल्या डावात 275 धावांच करू शकला. चौथ्या दिवशी टीम इंडियाने फॉलोऑन दिला आणि गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवला आहे आणि एक विश्वविक्रमदेखील नावावर केला. आफ्रिका संघाला पराभूत करण्यापूर्वी भारताने 10 कसोटी मालिका घरच्या मैदानावर जिंकली आहे आणि या विजयसह ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा घरच्या मैदानावर मिळवलेल्या सलग 10 विजयांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. भारतीय संघाने ऑक्टोबर 2018 नंतर पहिल्यांदा घरच्या मैदानावर टेस्ट मालिका खेळली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाने त्यांच्या घरी खेळत दहापेक्षा जास्त कसोटी मालिका जिंकल्या नाहीत. दुसरीकडे, टीम इंडियाने 2013 पासून भारतात 31 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी, पाच सामने अनिर्णित राहिले तर, 25 मध्ये संघाने विजय मिळवला. विशेष म्हणजे संघाचा भारतात खेळलेल्या मॅचमध्ये फक्त 1 पराभव झाला आहे. (IND vs SA 2nd Test: रविचंद्रन अश्विन याने डेनिस लिली, चमिंडा वास यांना टाकले पिछाडीवर)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला मागे टाकत नवीन विक्रमाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळत भारत अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 2012-13 मध्ये पराभूत झाला होता. त्यानंतर आतापर्यंत भारताने सतत विजय मिळवला आहे. हैदराबादमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात भारताकडून उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3, रविचंद्रन अश्विन याने 2, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी याने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेला भारताने चौथ्या दिवशी फॉलोऑन दिला होता. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर कमी झाला. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 326 धावांची आघाडी मिळाली. यापूर्वी, भारताकडून पहिल्या डावात अश्विनने चार, उमेशने तीन, शमीने दोन आणि जडेजाने एक गडी बाद केला होता. भारताने पहिले फलंदाजी करत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या 254 धावांच्या जोरावर 601 धावांचा टप्पा गाठला. विराटने शानदार फलंदाजी केली आणि टेस्ट करिअर मधील सर्वश्रेष्ठ धावांची नोंद केली. विराटशिवाय, सलामी फलदांज मयंक अग्रवाल याने देखील दमदार शतक केले, तर जडेजाने 91 धावा केल्या. दरम्यान, दोन्ही संघातील अंतिम टेस्ट सामना 19 ऑक्टोबरपासून रांचीच्या स्टेडियममध्ये खेळली जाईल.