धर्मशाळा येथील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ मोहाली येथील दुसऱ्या मॅचसाठी सज्ज आहे. आय एस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मालिका भारतासाठी टी-20 विश्वचषकच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आजच्या मॅचमध्ये भारतानं युवा खेळाडूंना संघात जागा दिली आहे. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्यावर लक्ष राहणार आहे. मागील काही दिवसांत पंतने आपल्या फलंदाजीमुळे काही काळ निराश केले आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर याला संधी देण्यात आली आहे. विंडीजविरुद्ध मालिकेत श्रेयसने प्रभावी कामगिरी केली होती. कर्णधार विराटने श्रेयसचे तोंड भरून कौतुक केले होते. त्यामुळे, श्रेयसला चौथ्या क्रमांकावर पुन्हा संधी देण्यात आली आहे. के एल राहुल याला पुन्हा संघात स्थान मिळवता आले नाही. राहुलचा फॉर्म सध्या काही चांगला नाही त्यामुळे त्याने टेस्ट संघातूनही आपले स्थान गमावले आहेत. (Live Streaming of IND vs SA, 2nd T20I Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी-20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर टेस्टसाठी फाफ डुप्लेसी याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहेत. विश्वचषकमधील निराशाजनक कामगिरीनांतर आफ्रिका संघाचा पहिला दौरा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन्ही मालिका महत्वाची असणार आहे.दुसरीकडे, वेस्ट इंडिजविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवले. यंदाच्या मालिकेतदेखील भारतीय संघ तशीच कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 13 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यात भारतानं 8 तर दक्षिण आफ्रिका संघानं 5 सामने जिंकले आहेत. दोन सामने रद्द झाले आहेत.
असा आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ:
टीम इंडिया: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर आणि नवदीप सैनी.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (उपकर्णधार), टेंबा बावुमा, बोर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नॉर्टजे, अँडिले फेल्लुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा आणि तबरायझ शमसी.