IND vs SA 1st Test: पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचे सावट, विशाखापट्टणममध्ये पाचही दिवस असणार असे हवामान
प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: @BCCI/Twitter)

दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध भारतीय संघ (Indian Team) तीन टेस्ट सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेची सुरुवात विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे होणार आहे.  याआधी दोन्ही संघातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 1-1 ने ड्रॉ झाली होती. त्यामुळे, यंदा टेस्ट मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील. पण, बुधवारपासून खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात चाहत्यांची चांगलीच निराशा होण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने येणाऱ्या पाचही दिवस इथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील एका आठवड्यापासून तिथे सतत पाऊस पडत आहे आणि तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 80 टक्के पावसाचा अंदाज आहे. (IND vs SA 1st Test: ऐतिहासिक कामगिरीवर विराट कोहली याची नजर, पहिल्या टेस्ट मॅचमध्ये असामान्य रेकॉर्ड करण्याची संधी)

सामन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी अनुक्रमे 50 आणि 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर शेवटच्या दोन दिवसांच्या खेळावरही पावसाचा परिणाम होऊ शकतो. याआधी विजयनगरम येथे दक्षिण आफ्रिका आणि बोर्ड अध्यक्ष इलेव्हन यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस जोरदार पावसामुळे वाहून गेला होता.

विराट कोहली याच्या नेतृत्वात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला नमवून टेस्ट चॅम्पियनशिपची दमदार सुरुवात केली. सध्या भारत टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 120 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 2 ऑक्टोबरपासून आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया घरच्या सीजनची सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध कोहलीचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड चांगला झाला आहे. आजवर आफ्रिका संघाला एकदाही भारतीय भूमीवर टेस्ट मालिका जिंकता आली नाही. Cricinfo वर उपलब्ध आकडेवारीनुसार, विराटने आफ्रिकाविरुद्ध भारतात चार कसोटी सामने खेळले आहेत. यातील तीनमध्ये भारत विजयी राहिला आहे तर एक मॅच अनिर्णीत राहिली. याआधी, दक्षिण आफ्रिका संघ 2015 मध्ये भारतात चार कसोटी मालिका खेळण्यासाठी आले होते. यातील पहिल्या मॅचमध्ये भारताने 108 धावांनी विजय मिळवला तर दुसरा सामना ड्रॉ झाला होता. तिसऱ्या मॅचमध्ये भारताने 124 आणि नंतर चौथ्या आणि अंतिम सामन्यात 337 धावांनी विजय मिळवला. पण, यंदातरी आफ्रिका संघ इतिहास बदलू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असेल.