IND vs SA 1st Test Day 4: भारत (India)आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 305 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने दिवसाखेर 4 बाद 94 धावा केल्या असून आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी त्यांना विजयासाठी आणखी 211 धावांची गरज आहे. तसेच विराट कोहलीचा भारतीय संघ विजयापासून फक्त 6 विकेट दूर आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी डीन एल्गार 52 धावा करून नाबाद खेळत होते. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर बुमराहने नाईटवॉचमन केशव महाराजचा त्रिफळा उडवला. तत्पूर्वी, भारताचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. भारताकडून रिषभ पंतने 34 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. टीम इंडियाने चौथ्या दिवशी 130 धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावात 174 धावा करून दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे टार्गेट ठेवले. (IND vs SA 1st Test: शार्दुल ठाकूर नो बॉलवर आऊट झाला? कगिसो रबाडाचा ओव्हरस्टेपिंगच्या व्हायरल फोटोने वादाला तोंड फोडले)
16/1 धावसंख्येपासून पुढे खेळताना भारताने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच नाईट वॉचमन शार्दुल ठाकूरची विकेट गमावली. केएल राहुलच्या रूपात टीम इंडियाला दिवसाचा दुसरा विकेट आणि डावातील तिसरी विकेट गमावली. राहुल 74 चेंडूत 23 धावा करून लुंगी एनगिडीच्या चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर विराट पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या डावात तो विकेटच्या मागे 18 धावांवर जेन्सनच्या चेंडूवर क्विंटन डी कॉककडे झेलबाद झाला. संघ अडचणीत असताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून मोठी अपेक्षा होती पण ते दोघे ती पूर्ण करू शकले नाही. पुजाराने दुसऱ्या डावात अवघ्या 16 धावा केल्या आणि एनगिडीच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाला. तर उपकर्णधार पदावरून हटवण्यात आलेला रहाणेला जॅन्सनने 20 धावांवर व्हॅन डेर ड्युसेनकडे झेलबाद केले. यानंतर नियमित अंतराने विकेट गमावल्याने भारताचा डाव 174 धावांवर संपुष्टात आला.
दरम्यान दिवसाच्या सुरुवातीला टॉस जिंकून विराट कोहलीने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला होता. राहुल आणि मयंकच्या सलामी जोडीने संघाला शानदार सुरुवात करून देत 117 धावांची भागीदारी केली. राहुलचे शतक आणि मयंकच्या अर्धशतकाच्या जोरावर 327 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 तर रबाडाने 3 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 197 धावांत गारद झाला. टेंबा बावुमा वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतकी धावसंख्या गाठता आले नाही.