भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान Proteas संघाचा डाव 197 धावांवर आटोपला तर दुसऱ्या डावात फलंदाजीला येत टीम इंडियाने (Team India) 1 बाद धावा 16 करून 146 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाखेरीस केएल राहुल 5 धावा आणि शार्दूल ठाकूर 4 धावा करून नाबाद खेळत होते. दुसऱ्या डावात भारताने मयंक अग्रवालच्या रूपात पहिली विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकी दवाबद्दल बोलायचे तर टेंबा बावुमाने (Temba Bavuma) संयमाने फलंदाजी करून अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद शमीने अर्धा यजमान संघ तंबूत धाडलं तर जसप्रीत बुमराह आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शमीने कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट देखील पूर्ण केले. अशाप्रकारे भारताला 130 धावांची मोठी आघाडी मिळाली. (IND vs SA 1st Test Day 3: मोहम्मद शमीचा ‘पंच’, कगिसो रबाडाची शिकार करून पूर्ण केल्या 200 कसोटी विकेट)

तत्पूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला भारताचा पहिला डाव 327 धावांवर संपुष्टात आला. भारताला रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आला, मात्र बुमराहने यजमान संघाचा कर्णधार डीन एल्गरला पहिल्याच षटकात वैयक्तिक 1 धावेवर पायचीत करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. उपाहारानंतर पहिले षटक घेऊन आलेल्या शमीने एका शानदार चेंडूवर कीगन पीटरसनला 15 धावांवर क्लीन बोल्ड केले. यानंतर कर्णधार एल्गरचा देखील शमीने एका शानदार चेंडूवर त्रिफळा उडवून भारताला तिसरे यश मिळवून दिले. सिराजने व्हॅन डर डुसेनला 3 धावांवर अजिंक्य रहाणेकडे झेलबाद केले. यजमान संघाच्या चार विकेट झटपट पडल्यावर क्विंटन डी कॉकने बावुमासह संयमाने फलंदाजी करून डाव सावरला. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना ठाकूरने 34 धावांवर डी कॉकचा त्रिफळा उडवला.

यानंतर शमीने 12 धावांवर विआन मुल्डरला आणि बावुमाला 52 धावांच्या अर्धशतकी खेळीनंतर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यांनतर एकापाठोपाठ संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. यापूर्वी भारतासाठी पहिल्या डावात केएल राहुलने 117 तर मयंक अग्रवालने 60 धावांची योगदान दिले. सामन्यातील दुसऱ्या दिवस पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला होता. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने 3 बाद 272 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण राहुल बाद झाल्यावर संघाचा डाव गडगडला 55 धावांवर पुढील 7 विकेट गमावल्या.