IND vs SA 1st Test 2021: सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर आजपासून भारत (India) आणि यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय ताफ्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी मिळाली आहे तर यजमान दक्षिण आफ्रिकेने 6 फूट 8 इंच उंचीचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनचा (Marco Jansen) संघात समावेश केला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजी करण्यासोबतच 21 वर्षीय मार्को खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करतो. याशिवाय खालच्या फळीत एनरिच नॉर्टजेच्या अनुपस्थितीत मार्को महत्वपूर्ण ठरू शकतो. (IND vs SA: टीम इंडिया पहिल्या 2 टेस्ट जिंकण्याचा प्रबळ दावेदार, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने सांगितले कारण)
दक्षिण आफ्रिकेच्या या युवा गोलंदाजाने या वर्षी आयपीएलमधेही पदार्पण केले आहे. त्याला रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले. आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्कोचा समावेश केला होता. या सामन्यात या डावखुऱ्या गोलंदाजाने 4 षटकात 28 धावा देत 2 विकेट घेतल्या. मात्र, त्यानंतर तो आणखी एकच सामना खेळू शकला. आणि आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला बाहेर केले आहे. दरम्यान मार्कोच्या अलीकडच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने भारत ‘अ’ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती ज्याने त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळवून दिली. त्याने तीन अनधिकृत कसोटी सामन्यात एकूण 6 विकेट घेतल्या. तर 4 डावात फलंदाजी करून 2 डावात तो नाबाद राहिला. याकार्यं त्याने 70 धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे त्याचा भाऊ डुआन देखील क्रिकेट खेळतो आणि 2018 मध्ये जेव्हा भारताने देशाचा दौरा केला तेव्हा दोघेही विराट कोहलीला गोलंदाजी करताना दिसले होते. भारताच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दोघांनीही विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्या विरोधात सर्वोत्तम गोलंदाजी केली. मार्कोने जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी नेट सेशनमध्ये विराट कोहलीला खूप त्रास दिला होता. त्यानंतर या युवा वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर विराट अनेकदा आऊट देखील झाला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच्या नेट सत्राच्या चित्राची मार्को यंदाही पुनरावृत्ती करू शकतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.