टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA Test Series: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका आजपासून सेंच्युरियन (Centurion) येथे खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेत 29 वर्षांपासून भारताला एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या टीम इंडियाला (Team India) यावेळी इतिहास बदलण्याची संधी आहे. खुद्द दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार अली बाकर (Ali Bacher) यांचेही असेच मत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि प्रशासक अली बकर यांना वाटते की भारत यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत फेव्हरेट म्हणून सुरुवात करेल कारण पाहुण्या संघाचा “सर्वोत्तम वेगवान आक्रमण” आहे. भारताकडे गेल्या 30 वर्षांतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे आणि त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात होईल, असा विश्वास बकर यांनी व्यक्त केला. (IND vs SA 1st Test: सेंच्युरियन कसोटीत विराट कोहलीने जिंकला टॉस, भारताचा पहिले फलंदाजीचा निर्णय; ‘या’ 11 धुरंधरांसह टीम इंडिया मैदानात)

भारताने एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही अशा मोजक्या ठिकाणांपैकी दक्षिण आफ्रिका एक आहे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात संघ यावेळी प्रतीक्षा संपवण्याचा निर्धारात असेल. अली बकर यांनी News18 शी खास संवाद साधताना सांगितले की, “पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे खेळवला जाईल जो समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर आहे आणि दुसरा सामना समुद्र सपाटीपासून 6000 फूट उंचीवर असलेल्या जोहान्सबर्गमधील वँडरर्स येथे खेळवला जाईल. या दोन कसोटी मैदानांची भिन्न भौगोलिक परिस्थिती आणि वांडरर्स आणि सुपरस्पोर्ट पार्क येथील वेगवान उसळत्या खेळपट्ट्या जलद गोलंदाजीसाठी अनुकूल आहेत. भारतीय संघाकडे गेल्या 30 वर्षांतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. त्यामुळे भारत पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल.” बकर यांच्या या विधानाने भारतीय चाहते नक्कीच खूश होतील.

दरम्यान बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात सलग दुसरी कसोटी मालिका आणि नंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात व विदेश दौऱ्यावर मालिका जिंकल्याने आत्मविश्वासाने भरपूर असेल. तथापि दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. भारताने विशेषत: सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि दोन्ही गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताची वाटचाल यंदाही सोपी असणार नाही.