दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला (Team India) जोरदार झटका बसला आहे. सेंच्युरियन कसोटीच्या (Centurion Test) तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 327 धावांवर आटोपला. यानंतर गोलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिले यश मिळवून दिले. उपाहारानंतर बुमराहचा पाय मुरडल्याने संघाला मोठा धक्का बसला आणि तो षटक अपूर्ण ठेवून मैदानाबाहेर गेला. वैद्यकीय उपचार घेतल्यावर बुमराह मैदानात परतला खरा पण तो अद्याप गोलंदाजी करू शकला नाही. 11व्या षटकातील 5वा चेंडू त्याने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला टाकताच त्याचा घोटा वळला. बुमराह जमिनीवर पडला आणि वेदनेने ओरडू लागला. टीम इंडियाचे फिजिओ नितीन पटेल यांनी मैदानावर धाव घेतली आणि बुमराहवर प्राथमिक उपचार केले. बुमराहच्या षटकातील शेवटचा चेंडू मोहम्मद सिराजने टाकला. दरम्यान बुमराहची दुखापत आणखी एका खेळाडूसाठी वरदान ठरू शकते. (IND vs SA 1st Test Day 3: विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी चिंतेची बाब, गोलंदाजी करताना ‘हा’ तडाखेबाज खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून आऊट)
जसप्रीत बुमराहची प्रकृती पाहता, तो सध्याच्या कसोटीतूनच नाही तर संपूर्ण मालिकेतून बाहेर पडू शकतो असे दिसत आहे. त्याचे स्कॅनिंग केले जाईल आणि वैद्यकीय अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. तथापि आता प्रश्न उद्भवतो की बुमराह कसोटी मालिकेतून बाहेर पडला तर त्याची जागा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण घेणार? अशा परीस्थितीत 100 हून अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असल्याने बुमराहच्या जागी इशांत शर्माला संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. इतकंच नाही तर इशांत शर्माने दक्षिण आफ्रिकेत 7 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 40.00 च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराह गोलंदाजी करण्यात अक्षम असल्यास इशांत शर्माला पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते.
Bumrah 😢 pic.twitter.com/rX2MaHUdzO
— N (@Nitinx18) December 28, 2021
सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवरील सामन्याबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 327 धावांवर गुंडाळला. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल या जोडीने दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा संघाला घेता आला नाही. तिसऱ्या दिवशी 3 बाद 272 धावांच्या पुढे खेळताना भारतीय संघाने शेवटच्या 7 विकेट केवळ 55 धावांवर गमावल्या.