IND vs SA 1st T20I: ऋषभ पंतच्या खांद्यावर टीम इंडियाची कमान, बनेल दुसरा सर्वात तरुण कर्णधार; ‘हा’ दिग्गज आहे नंबर 1
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st T20I: ऋषभ पंत (Rishabh Pant) आज (9 जून) दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेकसाठी बाहेर पडत आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून पदार्पण करेल. पंत मूलतः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 मध्ये केएल राहुलला (KL Rahul) सहाय्य करण्यासाठी तयार होता पण वरिष्ठ क्रिकेटर दुखापतीमुळे बाहेर पडला आणि पंतला भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली. तसेच हार्दिक पांड्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात अली असून त्याला त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ही भूमिका देण्यात आली आहे. ऋषभ कर्णधार म्हणून जेव्हा मैदानात उतरेल त्याच क्षणी तो विराट कोहली आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांनी सजलेल्या एलिट यादीत फक्त सामीलच होणार नाही, तर दिग्गज खेळाडूंच्या पुढेही जाईल. (IND vs SA 1st T20I: भारत विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर; पण Rishabh Pant समोर ‘हे’ आहे मोठे आव्हान)

भारताचा माजी अंडर-19 उपकर्णधार टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये नेतृत्व करणारा दुसरा सर्वात तरुण कर्णधार बनेल. 23 वर्षे आणि 197 दिवशी सुरेश रैनाच्या नावावर भारताचा सर्वात तरुण टी-20 होता. ऋषभ दुसऱ्या क्रमांकावर कर्णधारपदाची कारकीर्द सुरू करेल. तो 24 वर्षांचा असून त्याचा जन्म ऑक्टोबर 1997 मध्ये झाला होता. रैना आणि ऋषभ यांच्यानंतर धोनी असेल, जो 2007 टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करताना 26 वर्षांचा होता. 2006 मध्ये जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना केला तेव्हा भारताचा पहिला टी-20 कर्णधार वीरेंद्र सेहवाग 28 वर्षांचा होता. कोहली देखील 28 वर्षांचा होता जेव्हा त्याने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे, भारताच्या माजी कर्णधाराने 2013 मध्ये त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आणि 2014 मधील त्याच्या पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले. परंतु टी-20 कर्णधार म्हणून त्याचा पहिला सामना जानेवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध ठरला.

दुसरीकडे, 2015 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे त्यावेळी 28 वर्षांचा होता. 30 वर्षीय केएल राहुल भारताचा दुसरा सर्वात वयस्कर टी-20 कर्णधार बनला असता. दुखापतीमुळे बाहेर पडूनही राहुल नेतृत्व गटाचा भाग आहे आणि तो इंग्लंड दौऱ्यावर परततो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. सध्या भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला 34 वर्षे 308 दिवशी कर्णधारपद सोपवण्यात आले. या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली असतानाच तो इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे.