
IND vs PAK Bilateral Cricket: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) म्हणतो की, भारत (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) क्रिकेटपटू एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय खेळू इच्छितात परंतु दोन्ही देशांच्या राजकीय बाबी खेळाडूंच्या नियंत्रणात नाहीत. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात जानेवारी 2013 मध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका खेळले गेली. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तसेच 2007-08 मोसमापासून दोन्ही संघात कसोटी द्विपक्षीय मालिकेत खेळली गेलेली नाही. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याची पाकिस्तानकडून वेळोवेळी मागणी होत असली तरी भारताने प्रत्येक वेळी नकार दिला. (County Championship 2022: भारत-पाकिस्तानी क्रिकेटपटू आता एकत्र फलंदाजी करणार! चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिझवान यांनी Sussex काउंटीसाठी केले पदार्पण)
भारत आणि पाकिस्तान संघ विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. पाकिस्तान संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांची मायदेशात मालिका खेळण्याच्या तयारीत आहे. विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहम्मद रिझवान म्हणाला, “पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेटपटूंना एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे, परंतु दोन्ही देशांच्या राजकीय बाबी खेळाडूंच्या नियंत्रणात नाहीत.” 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही. 2005-06 मध्ये भारताने शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आणि राजकीय तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळलेला नाही. दरम्यान, रिजवानने आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताविरुद्ध शानदार खेळी केली होती. तर तो नुकताच काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारासोबत ससेक्स संघाकडून खेळताना दिसला. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली आणि नंतर दोघांनीही एकमेकांच्या खेळाचे गुणगान गायले.
रिझवान पुजाराबद्दल म्हणाला की, पुजारा खूप चांगला माणूस आहे. तो म्हणाला होता, “मला त्याच्या एकाग्रतेचे कौतुक वाटते. मला वाटते की युनूस खान, फवाद आलम आणि चेतेश्वर पुजारा हे तीन खेळाडू आहेत ज्यांना मी या बाबतीत खूप महत्त्व देतो.” भारतीय फलंदाज पुजाराने बुधवारीच रिझवानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या दोन संघांमधील शेवटचा सामना 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेत झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानचा भारतीय संघावरील वर्ल्ड कपमधील पहिलाच विजय ठरला.