भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Instagram)

कोविड-19 युगात क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यापासून सामने स्थगित करणे आणि रद्द करणे सामान्य बाब बनली आहे. क्रिकेट स्पर्धेचे व्यवस्थापन काळानुसार चांगले झाले असले तरी सामने पुढे ढकलणे अजूनही घडत आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय पथकात कोविडच्या प्रादुर्भावामुळे मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा टेस्ट सामना स्थगित करण्यात आल्यानंतर संपूर्ण मालिका आता पुढे ढकलण्यात आली आहे. आणि आता उन्हाळ्यात भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा (India Tour of New Zealand) व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि कोरोनाचे कठोर नियम पाहता पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन 2023 एकदिवसीय सुपर लीग (ODI Super League) अंतर्गत ते तीन एकदिवसीय सामने खेळणार होते. Stuff.co.nz नुसार, न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket) प्रवक्त्याने दौरा रद्द केल्याची पुष्टी केली आहे. तथापि, आतापर्यंत दौरा पुढे ढकलण्याबाबत बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट न्यूझीलंडकडून कोणतेही अधिकृत निवेदन समोर आलेले नाही. ()

Stuff.co.nz नुसार न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रवक्त्याने फ्युचर टूर प्रोग्रामनुसार टीम इंडिया (Team India) या हंगामात न्यूझीलंड दौरा करणार नाही याची पुष्टी केली असून हा दौरा 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. हा दौरा ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पुन्हा ठरवला जाऊ शकतो. लक्षात घेण्यासारखे म्हणजे कोरोना संसर्गासंदर्भात न्यूझीलंडमध्ये क्वारंटाईनचे कडक नियम आहेत. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट यांनी स्टफला सांगितले की, “आम्हाला दीर्घ हिवाळ्यापासून परत येणाऱ्या खेळाडूंबद्दल जागरूक राहावे लागेल आणि आम्हाला त्यांना घरीही वेळ द्यावा लागेल.” तथापि, भारत नोव्हेंबर महिन्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांसाठी ब्लॅककॅप्सचा पाहुणचार करणार आहे. तसेच भारत दौऱ्यावरून किवी टीम नोव्हेंबर अखेरीस घरी परतेल आणि त्यांचा क्वारंटाईन कालावधी कदाचित ख्रिसमसपूर्वी संपणार नाही; परिणामी न्यूझीलंडमध्ये यंदा बॉक्सिंग डे कसोटी खेळला जाणार नाही.

दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू सध्या आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहेत त्यानंतर ते थेट टी-20 विश्वचषक 2021 सामना खेळणार आहेत. तसेच 2021 चे भारताचे कॅलेंडर खूपच गुंतागुंतीचे झाले आहे आणि कोविडमुळे पुढच्या वर्षी जास्त आराम मिळेल असे वाटत नाही. दुसरीकडे, 2021 मध्ये किवींचे व्यस्त वेळापत्रक आहे, बांगलादेश दौऱ्यानंतर त्यांचे काही खेळाडू 2021 इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेत आहेत. त्यानंतर संघ विश्वचषक खेळतील. त्यानंतर ते भारत दौऱ्यावर दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळतील. त्यानंतर ते डिसेंबरमध्ये घरी परततील आणि 14 दिवसांच्या कडक क्वारंटाईन राहतील.