IND vs NZ 2nd Test: पृथ्वी शॉ ने न्यूझीलंडमध्ये ठोकले अर्धशतक, सचिन तेंडुलकरनंतर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
पृथ्वी शॉ (Photo Credit: IANS)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय (India) युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने शानदार अर्धशतक झळकावले. दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी शॉने 64 चेंडूंत 54 धावा केल्या. पृथ्वीचे टेस्ट कारकिर्दीतील हे दुसरे तर विदेशी जमिनीवरील हे पहिले अर्धशतक ठरले. या अर्धशतकासह त्याने एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आणि दिग्गज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) क्लबमध्ये सामील झाला. शॉने हेगले ओव्हलच्या मैदानावर आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. तो चांगल्या लयीत दिसत होता, पण काईल जैमीसनचा चेंडू ड्राइव करण्याच्या प्रयत्नात टॉम लाथमकडे कॅच आऊट झाला. यापूर्वी, पृथ्वी न्यूझीलंडमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. (IND vs NZ 2nd Test Day 1: पहिल्या दिवसाखेर भारत 242 धावांवर ऑलआऊट; न्यूझीलंडचा स्कोर 63/0, भारताकडे 179 धावांची आघाडी)

न्यूझीलंडमध्ये भारताकडून अर्धशतक झळकावणार्‍या युवा फलंदाजाच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. 1990 मध्ये वयाच्या 16 वर्षे आणि 291 दिवसांनी सचिनने नेपियरच्या मैदानावर अर्धशतक ठोकले होते. या शॉ नंतर 20 वर्षे 112 दिवस क्राइस्टचर्चच्या मैदानावर आणि अतुल वासनने वयाच्या 21 वर्ष 336 दिवस वयाच्या 1990 मध्ये ऑकलंडच्या मैदानावर हा पराक्रम केला होता. यापूर्वी वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वीने पहिल्या डावात 16 धावा केल्या, तर दुसर्‍या डावात तो 14 धावा करून बाद झाला. दुसर्‍या कसोटीत पृथ्वीच्या जागी शुभमन गिलचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली, पण शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले, ज्यानंतर त्याने अर्धशतक ठोकले.

दरम्यान, सध्या सुरु असेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 242 धावा केल्या. भारताकडून पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकी खेळी केली, तर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल आणि रिषभ पंत धावा करण्यास अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून दुसरा टेस्ट सामना खेळणाऱ्या जैमीसनने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवी सलामी जोडी टॉम लाथम 27, टॉम ब्लंडेल नाबाद 29 धावा करून खेळत होते.