IND vs NZ 2nd Test Day 1: पहिल्या दिवसाखेर भारत 242 धावांवर ऑलआऊट; न्यूझीलंडचा स्कोर 63/0, भारताकडे 179 धावांची आघाडी
टॉम लाथम, टॉम ब्लंडेल (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) मधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी किवी टीमने भारताला 242 धावांवर ऑलआऊट केले आणि नंतर फलंदाजी करत दिवसाखेर एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. टॉम लाथम (Tom Latham) 27 आणि टॉम ब्लंडेल (Tom Blundell) 29 नाबाद धावा करून खेळत आहे. दिवसाच्या सुरुवातीला किवी कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले. किवी संघाकडून दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या काईल जैमीसनने (Kyle Jamieson) 5 गडी बाद केले, तर 3 भारतीय फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी बजावली. मात्र कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. (IND vs NZ 1st Test Day 1: भारत पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट, काईल जैमीसन ने घेतल्या 5 विकेट)

टॉस गमावून भारताकडून पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालच्या जोडीने डावाची सुरुवात केली. पण, पुन्हा एकदा दोघे चांगली सुरुवात करू शकले नाही. मयंक 7 धावा करून माघारी परतला. याच्यानंतर पृथ्वीने टेस्ट कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने 54 धावांचा डाव खेळला. कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने 3 धावा केल्या आणि साऊथीचा शिकार बनला. साऊथीने विराटला एलबीडब्ल्यू आऊट केले. याच्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेला देखील साऊथीने 7 धावांवर आऊट केले. हनुमा विहारीने 67 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु नील वॅगनरच्या चेंडूवर 55 धावा करून तो बाद झाला. 54 धावा करून चेतेश्वर पुजाराही माघारी परतला.

याच्यानंतर भारताचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. जैमीसनने एकाच ओव्हरमध्ये रिषभ पंत आणि नंतर उमेश यादवला माघारी धाडले. पंत 12 धावांवर बाद झाला. उमेश खातेही उघडू शकला नाही. रविचंद्रन अश्विनच्या जागी प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळणारा रवींद्र जडेजा जैमीसनचा पाचवा शिकार बनला. शेवटची विकेट म्हणून मोहम्मद शमी बाद झाला. बोल्टने त्याला 16 धावांवर बोल्ड केले. न्यूझीलंडकडून जैमीसनने 5, साउथी व बोल्टने प्रत्येकी 2-2 आणि वॅगनरने 1 गडी बाद केला.