मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ 2nd Test Day 2: न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यावर यजमान टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद 69 धावा असून किवी संघावर 332 धावांची विशाल आघाडी घेतली होती. यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला पाहुण्या संघाचा फिरकीपटू एजाज पटेलच्या डावातील ऐतिहासिक 10 विकेटने यजमान संघाला पहिल्या डावात 325 धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात गोलंदाजांनी न्यूझीलंड फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. परिणामी संपूर्ण संघ फक्त 62 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे 263 धावांच्या आघाडीसह ‘विराटसेना’ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरली. वानखेडेवर दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयंक अग्रवाल 38 धावा आणि चेतेश्वर पुजारा 29 धावा करून खेळत होते. (Ajaz Patel's 10-wicket Haul: एका डावात 10 विकेट घेऊन इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलने केले मोठे वक्तव्य, आपल्या ऐतिहासिक कामगिरीवर जाणून घ्या काय म्हणाला)

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने न्यूझीलंडला सुरुवातीचे दोन धक्के दिले. त्याने विल यंगला कर्णधार विराट कोहलीने 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार टॉम लाथमला 10 धावांवर श्रेयस अय्यरकडे झेलबाद झाला. नवीन षटक घेऊन आलेल्या सिराजने पहिल्याच चेंडूवर अनुभवी रॉस टेलरचा त्रिफळा उडवला. अक्षर पटेलने किवी कसोटी संघात पुनरागमन केलेल्या डॅरिल मिशेलला 8 धावांवर एलबीडब्ल्यू माघारी पाठवले. तसेच चार वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळवलेल्या जयंत यादवने रचिन रवींद्रला 4 धावांवर बाद करत भारताला सहावे यश मिळवून दिले. आर अश्विनने ब्लंडेलला 8 धावांवर बाद केले तर टिम साउदीला शून्यावर माघारी धाडलं. अश्विनने विल सोमरविलला शून्यावर बाद करून भारताला नववे यश मिळवून दिले. अक्षर पटेलने काईल जेमीसनला 17 धावांवर बाद करून किवी संघाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून अश्विनने सर्वाधिक चार धावा केल्या. तर मोहम्मद सिराजने तीन, अक्षर पटेलने दोन तर जयंत यादवने एक गडी बाद केला.

यापूर्वी टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियासाठी पहिल्या डावात सलामीवीर मयंक अग्रवालने सर्वाधिक 150 धावा ठोकल्या. तर अक्षर पटेलने 52 आणि शुभमन गिलने 44 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, न्यूझीलंडचे मात्तबर गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलने सर्व 10 विकेट घेत इतिहास घडवला. पटेलने पहिल्या डावात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विनला शून्यावर बाद केले.