भारतीय कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात झंझावाती खेळी करताना काही खास विक्रम केले. रोहितने 36 चेंडूंचा सामना करत एक चौकार आणि पाच षटकारांसह 55 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 25 वे अर्धशतक आहे. आपल्या या तुफानी खेळी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 षटकार मारणारा रोहित हा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून अॅडम मिल्ने (Adam Milne) विरुद्ध हा विक्रम केला. तिन्ही फॉरमॅटसह फक्त वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी हा आकडा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेलच्या नावावर 553 तर आफ्रिदीच्या नावावर 476 षटकारांची नोंद आहे. (IND vs NZ 2nd T20 2021: सुरक्षेरक्षकांना चकमा देत रोहित शर्माचा चाहता मैदानात घुसला, ‘हिटमॅन’च्या पाया पडला, पहा व्हिडिओ)
तथापि उल्लेखनीय आहे की रोहित सर्वात जलद 450 आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. ‘हिटमॅन’ने 404 डावात हा विशेष पल्ला गाठला आहे. त्याच्या आधी आफ्रिदीने 487 डावात 450 आंतरराष्ट्रीय षटकार तर गेलने 499 डावात 450 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते. याशिवाय रोहितने सलामी जोडीदार केएल राहुलसह पहिल्या विकेटसाठी 13.2 षटकांत 117 धावांची भक्कम भागीदारी केली. रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारा खेळाडू ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये शतकी भागीदारी करण्याची त्याची ही 13 वी वेळ आहे. रोहितने बाबर आजम आणि मार्टिन गप्टिलला यांना या बाबतीत मागे टाकले. आजम आणि गुप्तिल यांनी 12 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकी भागीदारी केली आहे.
ℝ𝕠 has now hit 4️⃣5️⃣0️⃣ sixes in international cricket! 🙌💙#OneFamily #INDvNZ pic.twitter.com/mgsxXCQQNn
— Mumbai Indians (@mipaltan) November 19, 2021
तसेच आपल्या 25व्या टी-20 अर्धशतकी खेळी दरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या फॉरमॅटमधली ही त्याची 29 वी 50 पेक्षा धावसंख्या आहे. यामध्ये 25 अर्धशतके आणि 4 शतकांचा समावेश आहे. रोहितने या प्रकरणात टीम इंडिया सहकारी विराट कोहलीची बरोबरी केली, ज्याने देखील 29 वेळा आंतरराष्ट्रीय टी-20 हा पराक्रम केला आहे.