भारतीय संघाने विराट कोहली याच्या नेतृत्वात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत करून आणखी एका मालिकेवर नाव कोरले आहे. रविवारी बेंगळुरू येथे झालेल्या मालिकेच्या तिसर्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 7 गडी राखून सहज पराभूत केले. यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडच्या (New Zealand) आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. बंगळुरू वनडे सामन्यात सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याला ऑस्ट्रेलियाच्या डावात सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे धवन हा न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणार्या पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांच्या संपूर्ण दौर्यासाठी न्यूझीलंडला जाणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. (India Tour Of New Zealand 2020: भारताविरुद्ध न्यूझीलंड टी-20 संघ जाहीर, 'या' 32 वर्षीय खेळाडूचा पहिल्यांदा झाला समावेश )
धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी बजावली, परंतु दुखापतीमुळे त्याला पुन्हा एकदा सक्रिय क्रिकेटमधून बाहेर पडावे लागले आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी मुंबई मिररच्या वृत्तानुसार धवन दोन बॅचमध्ये न्यूझीलंड दौर्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सहभागी होणार नाही आणि त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल. धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडल्यावर त्याच्या जागी मयंक अग्रवाल याची वर्णी लागायची दाट शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अग्रवालशिवाय, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ ला टी-20 मालिकेत पुन्हा धवनच्या जागी संधी दिली जाऊ शकते. मयंक आणि पृथ्वी दोघेही सध्या न्यूझीलंडच्या भारत ए दौर्यावर आहेत. परंतु असेही वृत्त आहे की आश्चर्यकारक नावाची घोषणा देखील केली जाऊ शकते.
बंगळुरू वनडे सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने मारलेला शॉट रोखण्याच्या प्रयत्नात धवनला दुखापत झाली. यानंतर धवन खूप त्रास असल्याचे दिसले आणि त्याला मैदानाबाहेर नेऊन थेट एक्स-रेसाठी रुग्णालयातही नेले गेले. धवनच्या खांद्याला पट्टी लागली होती आणि त्याला पाहून न्यूझीलंडच्या दौर्यावर जाणे कठीण दिसत होते.