भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

न्यूझीलंडने (New Zealand) भारता (India) विरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आपली टीम जाहीर केली आहे. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांच्या दुखापतीमुळे हमीश बेनेट (Hamish Bennett) याला पहिल्यांदा न्यूझीलंडच्या टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. बांगलादेश विरुद्ध 2017 मध्ये झालेल्या वनडे सामन्यानंतर 32 वर्षीय बेनेट न्यूझीलंडकडून खेळला नाही. शिवाय, त्याने अद्याप किवी संघासाठी एकहीआंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला नाही. बेनेटने न्यूझीलंडकडून एक टेस्ट आणि 16 वनडे सामने खेळले आहेत. अलीकडे सुपर स्मॅशटी-20 मध्ये बेनेटने शानदार गोलंदाजी केली. त्याने 18.42 च्या सरासरीने आणि 7.06 च्या इकॉनॉमीने 14 गडी बाद केले. टी -20 सुपर स्मॅशमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. बोल्ट, हेन्री आणि फर्ग्युसन ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दुखापतीने ग्रस्त आहे. बोल्टला हात, हेन्री (अंगठा) आणि फर्ग्युसन काल्फमध्ये दुखापत आहे. 24 जानेवारीपासून सुरू होणार्‍या मालिकेत केन विल्यमसन (Kane Williamson) न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. (IND vs NZ: रोहित शर्मा,मोहम्मद शमी खेळणार न्यूझीलंड टी -२० मालिकेत; बीसीसीआयने टीम इंडिया संघाची केली घोषणा)

विल्यमसनही टी-20 संघात पुनरागमन करीत आहे. दुखापतीमुळे तो नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला नव्हता. टॉम ब्रुसचा शेवटच्या दोन सामन्यांत संघात समावेश करण्यात आला आहे. ब्रूसचा दोन सामन्यांसाठी कोलिन डी ग्रँडहोलमच्या जागी संघात समावेश होईल. भारत ए विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड एचा कर्णधार म्हणून ब्रुसला निवडण्यात आले असल्याने त्याला पहिल्या 3 सामन्यात खेळता येणार नाही. जिमी नीशमचा या संघात समावेश केलेला नाही आणि तो न्यूझीलंड अ संघाकडून भारत अ विरुद्ध खेळेल. दरम्यान, बेनेटसाठी भारतविरुद्ध मालिका महत्वाची असेल. गेल्या अनेक हंगामात तो सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्याने घरगुती क्रिकेटमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

असा आहे टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंड टी-20 संघ

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), हमीश बेनेट, टॉम ब्रुस (4-5 सामना), कोलिन डी ग्रँडहोलम (1-3 सामना), मार्टिन गप्टिल, स्कॉट कुग्गेलैन, डॅरेल मिशेल, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिशेल सॅटनर, टिम सेफर्ट, इश सोधी, टिम साउथी.