IND vs NZ Test 2020: मुंबईत जन्मलेला न्यूझीलंड खेळाडू एजाज पटेल टीम इंडियासाठी ठरू शकतो घातक
एजाज पटेल (Photo Credit: Getty Images)

टी-20 आणि वनडे मालिकेनंतर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zeland) टीम आता टेस्ट मालिकेत आमने-सामने येण्यास सज्ज आहे. 21 फेब्रुवारीला सुरु होणारा सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व (Basin Reserve) मैदानावर खेळला जाईल. न्यूझीलंडने सोमवारी 13 सदस्यीय टेस्ट संघ जाहीर केला आहे. टीममध्ये ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे, तर वनडे मालिकेत आपला दम दाखवलेला कायल जैमिसन लाही कसोटी संघात संधी मिळाली आहे. जर त्याला भारतविरुद्ध प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळायची संधी मिळाली तर तो वनडेनंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधेही डेब्यू करेल. याशिवाय कीवी संघाने अशा खेळाडूची निवड केली आहे जो भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो. भारतीय फलंदाज मागील काही वर्षांपासून फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहेत. यामुळे किवी टीमने सर्वात घातक असलेल्या फिरकीपटूचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे या खेळाडूचा जन्म भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे झाला होता. (IND vs NZ Test 2020: टीम इंडियाचे 'हे' 3 खेळाडू सिद्ध होऊ शकतात हुकुमी इक्का, मिळवून देऊ शकतील विजय)

एजाज पटेल (Ajaz Patel) असे या गोलंदाजाचे नाव आहे. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज एजाज 6 महिन्यांनंतर कीवी संघात परतला असून, त्याने पाकिस्तानविरुद्ध 2018 मध्ये अबुधाबी येथे कसोटी सामन्यातून पदार्पण केले. एजाजचा जन्म मुंबईत झाला होता पण तो 8 वर्षाचा असताना त्याचे कुटुंब ऑकलंडमध्ये स्थायिक झाले. भारतीय संघ गेल्या काही दौऱ्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करीत आहे. इंग्लंडमधील मोईन अली आणि ऑस्ट्रेलियामधील नॅथन लियोन याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा स्थितीत एजाज त्यांना आपल्या फिरकीने त्रास नक्की देऊ शकतो.

इजाझने 223 प्रथम श्रेणी विकेट घेतल्या आहेत आणि मोठी गोष्ट म्हणजे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक डावखुरा फलंदाज असल्याने एजाजचे महत्त्व आणखी वाढते. भारत-न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. यापैकी दुसरा सामना 29 फेब्रुवारी रोजी हॅगली ओव्हलमध्ये खेळवला जाईल.