वसीम जाफर (Photo Credits: Instagram)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 280 धावा करायच्या आहेत तर त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक आहेत. टीम इंडियाने (Team India) चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव 234/7 धावांवर घोषित केल्यावर दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविचंद्रन अश्विनने किवी संघाला मोठा धक्का दिला आणि सलामीवीर विल यंगला माघारी धाडलं होतं. आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी किवी टीमच्या विजयाची मदार टॉम लॅथम आणि केन विल्यमसनच्या खांद्यावर असेल. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) न्यूझीलंड संघाच्या मानसिकतेचा अंदाज वर्तवला आहे. जाफरने सांगितले की, सामन्याच्या शेवटच्या दिवशीचा निकाल काय लागेल. पाहुणा संघ सामना अनिर्णित ठेवण्याच्या उद्देशाने फलंदाजी करेल, असे ते म्हणाले. (IND vs NZ 1st Test Day 4: अखेरच्या दिवसाचा रोमांच वाढला; चौथ्या दिवसाखेर न्यूझीलंडच्या 1 बाद 4 धावा, भारताला 9 विकेटची आवश्यकता)

ESPNcricinfo शी बोलताना जाफर म्हणाला, “शेवटच्या दिवशी 275 धावा करणे नेहमीच कठीण असते. भारतीय संघाला हे माहीत होते म्हणून त्यांनी डाव घोषित केला असावा. जर न्यूझीलंड धावांसाठी खेळला तर त्यांना (भारत) आनंद होईल. त्यामुळे त्यांना विकेट घेण्याची संधी मिळेल. अशा खेळपट्टीवर कोणी फक्त बचाव करायला गेला तर अवघड आहे. न्यूझीलंड संघ अनिर्णीत सामन्यासाठी खेळेल हे भारताला माहीत आहे. त्यामुळे फलंदाजाकडे तीन ते चार क्षेत्ररक्षक असतील आणि इथून सामने जिंकणे न्यूझीलंडनाही कठीण असेल.”

दरम्यान कानपुर कसोटीच्या चौथ्या दिवशी 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाने एका विकेट गमवून 4 धावा केल्या. तत्पूर्वी चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला. भारताकडून दुसऱ्या डावात रिद्धिमान साहा 61 आणि अक्षर पटेल 28 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय पदार्पणवीर श्रेयस अय्यरने 65 धावा केल्या. तसेच किवी संघासाठी टिम साउदी आणि काईल जेमीसन यांनी प्रतेय्कई 3 विकेट घेतल्या.