भारत-न्यूझीलंड कसोटी (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य राहणेने (Ajinkya Rahane) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर भारताचा कर्णधार रहाणे फलंदाजीला आला आणि त्याने डाव सांभाळण्याचे काम केले. रहाणे लयीत फलंदाजी करत होता पण नशिब साथ देत असतानाही तो जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि 35 धावा करून काईल जेमीसनच्या (Kyle Jamieson) गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. 50व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला जेमीसनने क्लीन बोल्ड केले. रहाणेने चांगली सुरुवात केली होती पण त्याचे तो मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला आणि न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्क येथे भारताच्या पहिल्या डावात 35 धावांवर बाद झाला. (IND vs NZ 1st Test: भारताच्या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीतही केन विल्यमसनने न्यूझीलंडला विजयाचा दावेदार मानण्यास नकारले)

पण त्यापूर्वी टाकलेल्या चेंडूवर म्हणजेच 50 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेमीसनने अजिंक्य रहाणेला बाद म्हणून अपील केले होते. पंचांनी कॅच बिहाइंडच्या अपीलवर अजिंक्य रहाणेला बाद घोषित केले होते, परंतु पंचाच्या अपीलविरुद्ध जावून रहाणेने DRS रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. रहाणेचा हा निर्णय योग्य ठरला आणि त्याला जीवनदान मिळाला. तथापि पुढच्याच चेंडूवर काईल जेमीसनने त्याला क्लीन बोल्ड केले आणि नशिबाने मिळालेली लाइफलाइनवर पाणी फेरले. दरम्यान हे वृत्त लिहिपर्यंत टीम इंडियाने दुसरे सत्र संपल्यानंतर 4 विकेट गमावून 70 षटकात 212 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. जेमीसन हा न्यूझीलंडसाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने 3 विकेट घेतले आहेत. (अजिंक्यर रहाणेचे डिसमिसेल व्हिडिओ)

कानपुर कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल या नव्या सलामीच्या जोडीला टीम साउदी आणि जेमीसनच्या उच्च दर्जाच्या स्विंग गोलंदाजीने माघारी परतण्यास भाग पाडले. भारताने 100 धावा ओलांडल्यानंतर लगेचच चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांची 24 धावांची भागीदारी साउदीने मोडली, ज्याने पुजारा ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून 26 धावांवर झेलबाद केले.