टीम इंडिया (India) विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघाने 4 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत किवी संघाने रॉस टेलर (Ross Taylor) याचे शतक, हेन्री निकोल्स (Henry Nicholls) आणि कर्णधार टॉम लाथम (Tom Latham) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर विजय मिळवला. निकोल्सने 78 आणि लाथम 69 धावा करून बाद झाला. टेलर 109 धावा करून नाबाद राहिला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने 2, शार्दूल थरकुर याने 1 गडी बाद केला. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार लाथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर याचे शतक, केएल राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या आधारे भारताने 50 षटकांत 4 गडी गमावून 347 धावा केल्या. (IND vs NZ 1st ODI: विराट कोहली याने डायरेक्ट थ्रो ने हेन्री निकोल्सला केले रन आउट, Video पाहून तुम्हीही म्हणाल Woww)
348 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलसने किवी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 10 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दोघांनी एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. मात्र यानंतर शार्दुल ठाकूरने गप्टिल 32 धावांवर केदार जाधवकडे झेलबाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. कुलदीप पदार्पण करणाऱ्या टॉम ब्लेंडलला केएल राहुलकडून स्टंप आऊट केले. यानंतर भारताचा कर्णधार कोहलीने शानदार फिल्डिंग करत निकोल्सला 78 धावांवर रन आऊट केले.या शानदार खेळीत त्याने आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. रॉस टेलरने यांनतर शतक पूर्ण केले आणि संघाचा विजय निश्चित केला. हे टेलरचे कारकिर्दीतील 21 वे आणि भारताविरुद्ध तिसरे शतक आहे. जेम्स निशामने 9 धावा केल्या.
पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी भारतीय संघासाठी डावाची चांगली सुरुवात केली, पण दोघे मोठा डाव खेळू शकले नाही. पृथ्वी 20 आणि मयंक 32 धावा करून बाद झाला. भारताकडून श्रेयसने 103 धावा केल्या. राहुल 88 धावांवर नाबाद राहिला, कोहली 51 धावा, आणि केदार जाधव याने 26 धावांचे योगदान दिले.