IND vs ENG T20 Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) क्रिकेट संघात कसोटी मालिकेनंतर आता 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत 72 धावा करताच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरेल. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 85 सामन्यात 50.5 च्या सरासरीने 2928 धावा केल्या आहेत तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 25 अर्धशतके नोंदविली आहेत. विराटशिवाय टीम इंडियाचा मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील या विशेष कामगिरीपासून 227 धावा दूर आहे. देशासाठी आतापर्यंत 108 आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यात शर्माने 32.6 च्या सरासरीने 2773 धावा केल्या आहेत. (ICC T20I Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारी जाहीर; केएल राहुल दुसऱ्या स्थानी कायम तर, विराट कोहली याची एका स्थानाची झेप)
रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये शर्माची चार शतके आणि 21 अर्धशतके आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 118 धावांची वैयक्तिक कामगिरी केली आहे. इतकंच नाही तर विराट कोहली आणि रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 मध्ये एकूण 25 अर्धशतके केली आहेत. त्यामुळे, आगामी इंग्लंड मालिकेत सर्वाधिक टी-20 अर्धशतकाच्या यादीत अव्वल स्थान पटकावण्याची दोन्ही भारतीय फलंदाजांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकाच्या यादीत विराट आणि रोहितच्या मागे डेविड वॉर्नर-मार्टिन गप्टिल यांनी प्रत्येकी 19 पन्नाशीसह दुसरे स्थान पटकावले आहे. दरम्यान, टीम इंडिया आणि इंग्लड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सर्व पाच टी-20 सामने खेळले जाणार आहेत. यापूर्वी, दोन्ही संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने विजय मिळवला.
दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 14 टी-20 सामने खेळले गेले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 7 सामने जिंकले आहेत. मात्र, शेवटच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडवर भारतीय संघ वरचढ ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या 5 टी-20 सामन्यांपैकी 4 भारताने जिंकला आहे. याशिवाय एका सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.