जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2021 Series: इंग्लंड कसोटी संघाचा (England Test Team) कर्णधार जो रूट  (Koe Root) सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मचा आनंद लुटत आहेत. ब्रिटन दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) रूटने जबराट खेळी केली आहे. भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याने तिसरे शतक झळकावले आहे. त्याने सध्या लीड्समध्ये सुरु असलेल्या भारताविरुद्ध कसोटी सामन्यात शतकी खेळी करत अनेक विक्रम स्थापित केले आहेत. त्याने 2021 या वर्षी कर्णधार म्हणून सहा कसोटी शतक लगावली आहेत. इतकंच नाही तर यंदाच्या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत देखील रूट सध्या अनेकपटीने आघाडीवर आहे. रूटने 2021 मध्ये आतापर्यंत 11 सामन्यात 1398 धावा केल्या असून त्याची सरासरी 69.90 इतकी राहिली होती. रूटच्या मागावर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma),  श्रीलंकन लाहिरू थिरिमाने आणि टीम इंडियाचा (Team India) युवा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतही (Rishabh Pant) आहेत पण रूटच्या नंबर वन सिंहासनाला त्यांच्यापासून अद्याप तरी धोका नाही आहे. (IND vs ENG 3rd Test Day 2: रूट नॉन-स्टॉप! इंग्लिश कर्णधाराने ठोकले भारताविरुद्ध मालिकेतील तिसरे शतक, अनेक मोठे विक्रम केले काबीज)

रूटच्या मागे दुसऱ्या स्थानावर असलेल्या रोहितने आतापर्यंत 10 सामन्यात एकूण 720 धावा केल्या आहेत. म्हणजेच रोहित इंग्लिश कर्णधाराच्या दोन हजारपेक्षा अधिक धावांनी पिछाडीवर आहेत. त्यांनतर थिरिमनेने 7 कसोटी सामन्यांमध्ये 659 धावा तर पंतने 10 कसोटींमध्ये 646 धावा चोपल्या आहेत. अशास्थितीत 2021 सालात रूटचे वादळ घोंगावणार असे दिसत आहे. भारताविरुद्ध मालिकेनंतर इंग्लिश संघ डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅशेस मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे रूटकडे टेस्ट क्रिकेटच्या या यादीत मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड संघाचा पाहुणचार करतील ज्यांच्याकडून त्यांना यापूर्वी जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. म्हणूनच एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या 2021 फलंदाजांच्या यादीतील टॉप-5 फलंदाजांमध्ये चुरशीची लढत रांगणार आहे.

दुसरीकडे, भारताविरुद्ध लीड्सच्या हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून रूटने शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली, तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या टी-20 स्टार डेविड मलाने 70 धावांची खेळी केली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रुटने या मालिकेतील सलग तिसरे शतक ठोकले आणि 121 धावांची खेळी केली.