IND vs ENG 4th Test: इंग्लंडचा (England) अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) त्याच्या झंझावाती आणि स्विंग गोलंदाजीसाठी जगात ओळखला जात असला तरी शुक्रवारी त्याने भारताविरुद्ध (India) लंडनच्या केनिंग्टन ओव्हलमध्ये (Kennington Oval) चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना विशेष कामगिरी केली. पहिल्या डावात भारताच्या 191 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. यासह इंग्लंडने पहिल्या डावात 99 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. इंग्लंडची शेवटची विकेट क्रिस वोक्सच्या रूपात पडली, जो 50 धावांची शानदार खेळी खेळून धावबाद झाला. इंग्लंडकडून अँडरसन एका धावेवर नाबाद राहिला. अशाप्रकारे अँडरसनने नाबाद राहत एक खास ‘शतक’ ठोकले आहे. ओव्हलवर इंग्लंडच्या डावाच्या अखेरीस अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 100 वेळा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. अँडरसनने 12 चेंडूत नाबाद 1 धावा केल्या. हा एक विक्रम आहे जो जगातील महान फलंदाज देखील बनवू शकले नाही. (IND vs ENG 4th Test: मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या दोन इंग्लंड खेळाडूंनी केला कहर, टीम इंडियाचा खेळ खराब केला)
विशेष गोष्ट म्हणजे या यादीत त्याला टक्कर देणारा दुसरा कोणताही खेळाडू नाही आहे. त्याच्यानंतर, जो खेळाडू या यादीत आहे, त्याच्या आणि अँडरसनमध्ये 39 आकड्यांचा फरक आहे. अँडरसननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाबाद राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचे दिग्गज कोर्टनी वॉल्शच्या नावावर आहे. त्यांनी हा पराक्रम 61 वेळा केला आहे. या यादीत असलेल्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचे तर त्यामध्ये बहुतेक गोलंदाजांचा यामध्ये समावेश आहे. अँडरसन आणि वॉल्श व्यतिरिक्त यात मुथय्या मुरलीधरन, बॉब विलिस, क्रिस मार्टिन, ग्लेन मॅकग्रा आणि शिवनारायण चंद्रपॉल यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, भारताविरुद्ध कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात अँडरसनने मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत महान सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले आहे. अँडरसन इंग्लंडमध्ये आपला 95 वा कसोटी सामना खेळत आहे, तर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत भारतीय भूमीवर एकूण 94 कसोटी सामने खेळले आहेत. सचिननंतर या यादीत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये 92 कसोटी सामने खेळले आहेत.
दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी 3 बाद 53 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात करत इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा केल्या. ओली पोपने सर्वाधिक 81 धावा ठोकल्या तर दुखापतीतून संघात कमबॅक करणाऱ्या क्रिस वोक्सने 50 धावांचे अर्धशतकी योगदान दिले.