IND vs ENG 4th Test 2021: जो रूटच्या इंग्लंड (England) संघाविरुद्ध ओव्हल मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दिलेल्या 368 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड संघ 92.2 ओव्हरमध्ये धावाच 210 करू शकला परिणामी त्यांना 157 धावांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे भारताने ब्रिटनमध्ये या मैदानावर तब्बल 50 वर्षानंतर विजयाची नोंद केली आहे. तसेच पाच सामन्याच्या मालिकेत भारत आता 2-1 अशा आघाडीवर आहे. आता मालिकेचा अंतिम सामना मँचेस्टर येथे 10 सप्टेंबरपासून खेळला जाईल. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड आपल्या सुरुवातीचा फायदा करू शकला नाही आणि अखेरच्या दिवशी संघाचा डाव पत्त्यासारखा विखुरला. हसीब हमीदने सर्वाधिक 63 धावा केल्या तर रोरी बर्न्सने 50 धावा काढल्या. तसेच कर्णधार जो रूटने 36 धाव केल्या. दुसरीकडे, भारताच्या गोलंदाजांनी चमकदार खेळी केली. (IND vs ENG 4th Test: ओव्हलवर भारताचा दे दणादण! ‘विराटसेने’कडून अजित वडेकरांच्या संघाच्या ‘या’ कामगिरीची पुनरावृत्ती)
पाचव्या दिवशी इंग्लंडने बिनबाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. बर्न्स आणि हमीदच्या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. मात्र, बर्न्स अर्धशतक पूर्ण करताच लगेचच बाद झाला. त्यानंतर काहीवेळातच हमीदनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याला डेविड मलान चांगली साथ देत होता, मात्र त्याला राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आलेल्या मयंक अग्रवाल आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने मिळून त्याला 5 धावांवर माघारी धाडलं. मलान बाद झाल्यावर रुटने हमीदला चांगली साथ दिली. त्यांनी पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. पण दुसऱ्या सेशनला सुरुवात होताच बुमराह आणि जडेजाने ओली पोप, जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली यांना स्वस्तात माघारी धाडलं. बर्न्स, हमीद आणि कर्णधार जो रुट यांना वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करण्यात यश आले नाही. भारतासाठी उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
यापूर्वी सामन्यात इंग्लंडने भारताचा पहिला डाव 191 धावांवर रोखला आणि 290 धावा करून 99 धावांची आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी गियर बदलला आणि धावांचा डोंगर उभारला. रोहित शर्माने सर्वाधिक 127 धावा ठोकल्या. तर चेतेश्वर पुजाराने 61, शार्दूल ठाकूरने 60 आणि रिषभ पंतने 50 धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलने 46 आणि विराट कोहलीने 44 धावा ठोकल्या.