IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील ओव्हल (The Oval) मैदानावर सुरु असलेला चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे आणि भारताने दिलेल्या 368 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 32 ओव्हरमध्ये बिनबाद 77 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी आता पाचव्या दिवशी आणखी 291 धावांची गरज आहे. इंग्लिश संघासाठी रोरी बर्न्स (Rory Burns) 31 आणि हसीब हमीद (Haseeb Hameed) 42 धावांवर नाबाद खेळत आहेत. दोंघांनी दिवसाच्या अखेरच्या सत्रात फलंदाजीला येत संघाला आश्वासक सुरुवात करून देत अर्धशतकी भागीदारी केली. बर्न्स आणि हमीदच्या जोडीने संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना केला आणि संघाची पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अशाप्रकारे भारतीय संघाला (Indian Team) विजयासाठी 10 विकेट्सची गरज आहे. भारताने दुसऱ्या डावात 148.2 षटकांत सर्वबाद 466 धावा केल्या. त्यामुळे 367 धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान ठेवले. (IND vs ENG: टीम इंडियाला जोरदार धक्का; रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना दुखापत झाली, वेदनेमुळे मैदानावर येणे झाले मुश्किल)
भारताकडून दुसऱ्या डावात ‘हिटमॅन’ रोहितने तुफान फलंदाजी करत 127 धावांची शतकी खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 61, शार्दुल ठाकूरने 60 आणि रिषभ पंतने 50 धावांची अर्धशतकी कामगिरी केली. तसेच केएल राहुलने 46 आणि विराट कोहलीने 44 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ऑली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय जेम्स अँडरसन, क्रेग ओव्हरटन आणि जो रुटने प्रत्येकी 1 विकेट घेतली. टीम इंडियाचे चौथ्या दिवशी 270/3 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या तीनही सत्रात इंग्लंड गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स घेतल्या पण त्यांना भारताचा डाव झटपट संपवण्यात अपयश आले. पहिल्या सेशनमध्ये रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली माघारी परतले तर पंतने शार्दुलसह फलंदाजी करत पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱ्या सत्रात दोघांनी आपली विकेट जाणार नाही याची काळजी घेत इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या तीनशेपार नेली.
दरम्यान, शार्दुलने सामन्यातील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो त्यानंतर लगेचच 60 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पंतही अर्धशतक करुन लगेचच बाद झाला. यानंतर उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहने आक्रमक खेळ करत भारताच्या धावसंख्येत आणखी भर घातली. दोघांनी भारतासाठी फटकेबाजी सुरूच ठेवली. उमेश आणि बुमराहची जोडी वोक्सने बुमराहला 24 धावांवर बाद करत तोडली. तर, उमेशला अखेर ओव्हरटनने 25 धावांवर बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. सिराज 3 धावांवर नाबाद राहिला.