IND vs ENG 4th Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हल (The Oval) मोदानात सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. परिणामी भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 17 ओव्हरमध्ये 53/3 धावांपर्यंत मजल मारली. अशाप्रकारे भारताकडे अद्याप 138 धावांची आघाडी आहे. ओव्हर मैदानावर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडसाठी डेविड मलान (Dawid Malan) 26 धावा आणि क्रेग ओव्हरटन 1 धाव करून खेळत होते. इंग्लिश संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) पहिल्या डावात 21 धावा करून माघारी परतला आहे. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध गोलंदाजांनी भारताला सामन्यात वर्चस्व मिळवून दिले आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2 तर उमेश यादवने 1 विकेट घेतली आहे. (IND vs ENG 4th Test: ओव्हल मैदानात घोंगावलं Shardul Thakur चं वादळ, माजी इंग्लंड दिग्गज क्रिकेटपटूला पछाडत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान)
ओव्हल मैदानावर चौथ्या टेस्ट सामन्यात भारताने आधी कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने केलेल्या 57 धावांची जोरदार फटकेबाजी करत 191 धावांपर्यंत मजल मारली. विराट-शार्दुल व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. इंग्लडच्या वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांवर दबाव आणला होता. इंग्लंडकडून पहिल्या डावात दुखापतीतून ब्रिटिश कसोटी संघात कमबॅक करणाऱ्या क्रिस वोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सनने 3, जेम्स अँडरसनने 1 आणि क्रेग ओव्हरटनने एक विकेट घेतली.
India finish the first day on a high after a solid bowling performance.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/4YuwlSZJLU
— ICC (@ICC) September 2, 2021
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे चौथी कसोटी जिंकून मालिकेत आघाडीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. 2 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघानी महत्वपूर्ण बदल केले आहेत. भारतीय संघात मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी शार्दूल ठाकूर व उमेश यादवला संधी दिली आहे. तर इंग्लंडच्या संघात सॅम करनच्या जागी वोक्स आणि जोस बटलरच्या जागी ओली पोपचा समावेश झाला आहे.