![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/09/IND-ENG-The-Oval-2021-Test-380x214.jpg)
IND vs ENG 4th Test: लंडनच्या ओव्हल मैदानावर (The Oval) खेळण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) इंग्लंडविरुद्ध (England) जोरदार विजय मिळवला आहे. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ब्रिटनमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघ मालिकेच्या पाचव्या व अंतिम सामन्यात मँचेस्टर येथे आमनेसामने येतील. ओव्हल टेस्टच्या पहिल्या डावात 191 धावांवर ढेर झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात बॅट आणि नंतर बॉलने दबदबा कायम करत इंग्लंडचा खेळ खल्लास केला आणि धावांनी विजय मिळवला. भारताच्या ऐतिहासिक विजयात अनेक प्रमुख करणे ठरली जी खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 4th Test: भारताने इंग्लंडला पाजलं पराभवाचं पाणी, ओव्हल टेस्टमध्ये ‘हा’ ठरला टर्निंग पाँईट)
1. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने दुसऱ्या डावात फलंदाजी करत 127 धावांची शानदार शतकी खेळी केली. याशिवाय त्याने संघातील इतर खेळाडूंबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. ओव्हल कसोटीत टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान होते.
2. संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने दोन्ही डावांमध्ये जबरदस्त फलंदाजी करताना अर्धशतके धावसंख्या गाठली. तसेच गोलंदाजी करताना त्याने महत्त्वाच्या प्रसंगी संघाला विकेटही मिळवून दिले. ओव्हल कसोटीसाठी ठाकूर क्रिकेटच्या इतिहासात वर्षानुवर्षे चाहत्यांच्या लक्षात राहील.
3. ओव्हल कसोटीत कर्णधार विराट कोहलीनेही टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात 50 धावांचे अर्धशतक झळकावले, त्याशिवाय दुसऱ्या डावात 46 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
4. ओव्हल कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची उत्कृष्ट गोलंदाजी. सर्व गोलंदाजांनी रणनीती नुसार शिष्ठबद्ध कामगिरी बजावली आणि इंग्लिश फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. दुसऱ्या डावात हसीब हमीद आणि रोरी बर्न्स व्यतिरिक्त अन्य कोणताही विरोधी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर तग धरून खेळपट्टीवर टिकून राहू शकला नाही.
5. या खेळाडूंशिवाय चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत आणि केएल राहुलसह इतर अनेक खेळाडूही सामन्यादरम्यान चांगल्या लयीत दिसले. पुजारा आणि पंतने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले. राहुलनेही 46 धावांची दमदार खेळी खेळली आणि केवळ 4 धावांनी त्याचे अर्धशतक हुकले.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात एकीकडे टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, यजमान संघ इंग्लंड ही मालिका 2-2 ने अनिर्णित ठेवण्याच्या प्रयत्नात असेल.