रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Rohit Sharma 9000 T20 Runs: इंग्लंडविरुद्ध (England) आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर बसल्यावर अखेर भारतीय संघाचा सलामी फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तिसऱ्या सामन्यातून मैदानात पुनरागमन केले. मात्र, त्याला त्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही आणि फक्त 15 धावा करून बाद झाला. आजच्या चौथ्या सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून यजमान संघास पहिले फलंदाजी करण्यास बोलावले आणि रोहितने 11 धावा करताच एक मोठा कीर्तिमान आपल्या नावावर केला. टीम इंडियाच्या 'हिटमॅन'ने टी-20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांच्या एलिट यादीत स्थान मिळवले. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावे एकूण 341 सामन्यात टी-20 मध्ये एकूण 8, 989 धावांची नोंद होती. त्यामुळे रोहित 11 धावा करताच अशी कामगिरी दुसरा भारतीय ठरला. (IND vs ENG 4th T20I 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; KL भारतीय संघात कायम, पहा कोण IN आणि कोण OUT)

रोहितपूर्वी टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) ही कामगिरी केली आहे. विराटने टी-20 मध्ये 302 सामन्यात 9, 650 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहितने इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथील तिसऱ्या सामन्यात 17 चेंडूत 15 धावांची खेळी केली होती. सामन्यात रोहितला चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्याचे तो मोठ्या आकड्यात रुपांतर करू शकला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये आजवर फक्त 8 फलंदाजांनी 9 हजाराहून अधिक धावा केल्या वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल आघाडीवर आहे. गेलने आजवर 416 टी-20 सामन्यात 13,720 धावा केल्या आहेत. दरम्यान, भारताविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लिश कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पुन्हा पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. ईशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला असून युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चाहरला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघात कोणताही बदल झालेला नाही. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली असून मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, यापूर्वी कसोटी मालिकेत त्याने 6 डावात 47 पेक्षा अधिकच्या सरासरीने एकूण 474 धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच नाही तर 32 वर्षीय रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2800 धावा पूर्ण करण्याच्या ही उंबरठ्यावर आहे.