विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd Test 2021: अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर (Sardar Patel Stadium) 24 फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना दिवस/रात्र असून पिंक-बॉलने खेळला जाईल. दोन्ही संघात पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळला जाणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शिवाय, कोरोना काळात पहिल्यांदा या नवनिर्मित स्टेडियमवर चाहते उपस्थित असतील. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी मिळाली नव्हती, मात्र दुसऱ्या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये एंट्री मिळाली आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ष सामन्यासाठी उपस्थित होता. हा सामना भारतीय संघासाठी अनेक गोष्टीमुळे विशेष ठरणार असेल. सामना जिंकून संघ मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दिशेने पाऊल उचलेल तर, टीम इंडियाच्या (Team India) काही खेळाडूंना या सामन्यात खास कीर्तिमान करण्याचीही संधी असेल जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ‘या’ 2 बदलांसह मैदानात उतरणार ‘विराटसेना’, पहा कोण होऊ शकते IND आणि कोण OUT)

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) नजर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (VVS Laxman) स्पेशल रेकॉर्डवर असेल. विराटने 65 धावा करताच तर तो घरच्या मैदानात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या टॉप-5 मध्ये यादीत सामील होईल. या यादीत सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. कोहलीने भारतात 41 टेस्टमध्ये 66 च्या सरासरीने 3,703 धावा केल्या असून तो यादीत सातव्या स्थानावर आहे. दिलीप वेंगसरकर 3725 धावांसह सहाव्या तर लक्ष्मण 3767 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, विराटला आता टॉप-5 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सामन्यात 65 किंवा अधिक धावांची गरज आहे. सचिनने 94 मॅचमध्ये 53 च्या सरासरीने सार्वधिक 7,216 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, सामन्यादरम्यान चेन्नई टेस्टचा नायक अश्विनवर (Ashwin) स्पॉटलाइट असेल. अश्विन 400 कसोटी विकेट्ससह गोलंदाजांच्या विशेष क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. अश्विनने आजवर 394 टेस्ट विकेट्स घेतल्या असून त्याला 400 कसोटी विकेटच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून 6 विकेट्स दूर आहे. शिवाय, अश्विनचा साथीदार इशांत शर्माला देखील भारताकडून सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यासाठी 10 विकेटची गरज आहे. इशांतच्या नावावर आजवर 302 कसोटी विकेट्स जमा आहेत. शिवाय, शर्मा सामन्यासाठी मैदानावर उतरताच देशासाठी 100 टेस्ट सामने खेळणारा 11वा तर फक्त दुसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरेल.